पुणे महापालिकेचे एक पाऊल पुढे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

पुणे : महापालिकेच्या हद्दीत पहिल्या टप्प्यात येणार असलेल्या गावांमधील बेकायदा बांधकामे, अपुरे व अरुंद रस्ते, अतिक्रमणे, वाहतूक, पाणी-कचरा-सांडपाण्याची अपुरी व्यवस्था इत्यादी समस्या सोडविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. या पार्श्‍वभूमीवर ही गावे सामावून घेण्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केली. त्यामुळे या गावांची लोकसंख्या, पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने नेमक्‍या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासून पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

पुणे : महापालिकेच्या हद्दीत पहिल्या टप्प्यात येणार असलेल्या गावांमधील बेकायदा बांधकामे, अपुरे व अरुंद रस्ते, अतिक्रमणे, वाहतूक, पाणी-कचरा-सांडपाण्याची अपुरी व्यवस्था इत्यादी समस्या सोडविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. या पार्श्‍वभूमीवर ही गावे सामावून घेण्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केली. त्यामुळे या गावांची लोकसंख्या, पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने नेमक्‍या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासून पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

गावे लोकसंख्या सांडपाणी पाणी (लिटर) कचरा (टन) 
11 2 लाख, 83 हजार 1 हजार किलोमीटर 4 कोटी 24 लाख 350-400 

रस्त्यांची समस्या असलेली गावे 
धायरी, उंड्री, उत्तमनगर आणि शिवणे, फुरसुंगी, उरळी देवाची, साडेसतरा नळी 

पाण्याची समस्या असलेली गावे 
फुरसुंगी, उंडी, धायरी, आंबेगाव खुर्द 

घनकचरा व व्यवस्थापन 
धायरी, उत्तमनगर, शिवणे, आंबेगाव (बुद्रुक, खुर्द) 

वाहतूक कोंडी 
उंडी, उत्तमनगर, शिवणे, साडेसतरा नळी 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 
उरळी देवाची, फुरसुंगी, धायरी, आंबेगाव (बुद्रुक आणि खुर्द) 

पाणी 
नव्याने महापालिकेत येणाऱ्या गावांची लोकसंख्या सुमारे 2 लाख 83 हजार इतकी आहे. त्यामुळे या गावांना रोज 4 कोटी 24 लाख 50 हजार लिटर इतके पाणी पुरवावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये साठवण बांधण्यात येणार आहेत; तसेच जुन्या जलवाहिन्यांना समांतर यंत्रणा म्हणून नवीन वाहिन्या टाकण्यात येणार असून, नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचाही अभ्यास करण्याचे नियोजन आहे. 

रस्ते 
गावांमधील नागरिकांना चांगले आणि पुरेसे रस्ते पुरविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे 80 चौरस मीटर रस्त्यांची नव्याने बांधणी करण्यात येणार आहे. दुसरीकडे गावांमधील मूळ रस्त्यांची रुंदी मोजून त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येतील. ज्यामुळे गावांमधील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी मोकळे होणार आहेत. प्रत्येक गावात जोड आणि अंतर्गत रस्त्यांचे जाळे विस्तारले जाणार असल्याचे पथविभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

कचरा 
या गावांमध्ये पुढील पाच वर्षांत रोज सरासरी 350 ते 400 टन कचरा जमा होण्याचा अंदाज महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचा आहे. त्यासाठी छोट्या-मोठ्या क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. किमान पाच ते 50 टन क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांच्या निधीची आवश्‍यकता असेल. टप्प्याने निधी उपलब्ध होण्याची शक्‍यता असून, प्रकल्पांची उभारणी केली जाईल. 

सांडपाणी 
सांडपाण्याची सोय करताना गावांमध्ये सुमारे एक हजार किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्यांचे जाळे निर्माण करावे लागणार आहे. त्यासाठी ज्या गावांमध्ये आता सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था आहे, त्याची पाहणी करून नव्या वाहिनी टाकण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. दुसरीकडे या गावांमध्ये सार्वजनिक स्वरूपाची 60 स्वच्छतागृहे उभारली जाणार असून, प्रत्येक गावामध्ये पहिल्या वर्षापासून वैयक्तिक स्वच्छतागृहांची कामे हाती घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. 

गावांना हव्या असलेल्या अन्य सुविधा : 

  • शाळा, त्याकरिता इमारती, मैदाने, 
  • पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा विस्तारणे 
  • बसथांबे 
  • आरोग्य सेवा (रुग्णालये) 
  • उद्याने, क्रीडांगणे 
  • सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 
  • जलशुद्धीकरण प्रकल्प