शिवाजीनगर - रामवाडी मेट्रोची अलाइनमेंट निश्‍चित होईना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

पुणे : शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे, असा दावा करणाऱ्या 'महामेट्रो'चा वनाज - रामवाडीचा अर्धा मार्गच अजून निश्‍चित झालेला नाही. मात्र, दोन्ही मार्ग आणि स्थानकांची उभारणी करण्यासाठीची निविदाप्रक्रिया 'तातडीने' आणि 'वेळेत' पूर्ण करण्याची तत्परता महामेट्रोने दाखविली आहे. 

पुणे : शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे, असा दावा करणाऱ्या 'महामेट्रो'चा वनाज - रामवाडीचा अर्धा मार्गच अजून निश्‍चित झालेला नाही. मात्र, दोन्ही मार्ग आणि स्थानकांची उभारणी करण्यासाठीची निविदाप्रक्रिया 'तातडीने' आणि 'वेळेत' पूर्ण करण्याची तत्परता महामेट्रोने दाखविली आहे. 

वनाज - रामवाडी आणि पिंपरी - स्वारगेट मेट्रो मार्गाला केंद्र सरकारने गेल्या वर्षी 7 डिसेंबरला मंजुरी दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येऊन मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन केले. सुमारे 11 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारनेही वेळेत आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांनीही कर्ज देण्याची तयारी दाखविली असून, त्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पिंपरी - स्वारगेट मार्गाचे काम सुमारे चार महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. पाठोपाठ वनाज - रामवाडी मार्गाचे कामही गेल्या महिन्यात सुरू झाले. या दोन्ही मार्गांवर महामेट्रोतर्फे स्थानके उभारण्यात येणार आहेत, त्यासाठीची निविदा प्रक्रिया आठ दिवसांपूर्वीच पूर्ण झाली आहे. स्थानके उभारण्यासाठी निविदा प्रक्रियांमध्ये सहभागी झालेल्यांमधून कंपनी निश्‍चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. 

पिंपरी - स्वारगेट मार्गाची नेमकी अलाइनमेंट निश्‍चित झाली आहे. तर, वनाज - रामवाडी मार्गावर वनाज - शिवाजीनगर न्यायालयादरम्यान अलाइनमेंट निश्‍चित झाली आहे. परंतु, शिवाजीनगर न्यायालय ते रामवाडी दरम्यानची अलाइनमेंट अजूनही निश्‍चित झालेली नाही. मात्र, अलाइनमेंट निश्‍चित झालेली नसताना स्थानकांच्या निविदा महामेट्रोने प्रसिद्ध कशा केल्या, असा प्रश्‍न प्रशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या वर्तुळातून उपस्थित करण्यात आला आहे. 

निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई नसताना महामेट्रो त्यासाठी आग्रही का आहे, अशीही विचारणा सध्या होत आहे. सुमारे अकरा हजार कोटी रुपये इतक्‍या खर्चाच्या प्रकल्पात मार्गांची अलाइनमेंट निश्‍चित झाल्यावर स्थानके उभारणीसाठीची प्रक्रिया होत असते. परंतु, महामेट्रोने निविदा अगोदर प्रसिद्ध केल्या आणि आता मार्गाची अलाइनमेंट निश्‍चित करण्यात येत आहे. 

'अलाइनमेंट' एक महिन्यात 
मेट्रोच्या पुणे आणि पिंपरी - चिंचवडमधील मार्गांची ढोबळ अलाइनमेंट निश्‍चित आहे. शिवाजीनगर - रामवाडी मार्गाची अलाइनमेंट निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात लोहमार्गांचे दोन वेळा 'क्रॉसिंग' येणार आहे. तसेच, नदीपात्र आणि नदीपात्र ओलांडण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी वेळ लागत आहे. परंतु, एका महिन्यात अलाइनमेंट पूर्ण होईल. त्यानंतरच स्थानकांचे काम सुरू होईल. अलाइनमेंट निश्‍चित करताना स्थानकांची पूर्वी गृहीत धरलेली जागा मागे - पुढे होऊ शकते. परंतु, अलाइनमेंट निश्‍चित झाल्यावरच स्थानकांची जागा समजेल, असे महामेट्रोच्या अधिकृत सूत्रांनी नमूद केले.