पुरुषोत्तमच्या महाअंतिम फेरीची आज वाजणार घंटा ! 

पुरुषोत्तमच्या महाअंतिम फेरीची आज वाजणार घंटा ! 

तरुणाईची शान असणाऱ्या पुरुषोत्तम करंडकाची महाअंतिम फेरी शुक्रवार (ता. 15) पासून सुरू होत आहे. पुढील तीन दिवस भरत नाट्य मंदिरात हा सोहळा होत असून, त्यात सहभागी होणारे विद्यार्थी-संयोजकांची तयारी अंतिम टप्प्यात पोचली आहे. नेहमीचाच उत्साह आणि जल्लोषात ते काम सुरू असून, यंदाही वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी केली जाणार आहे. यानिमित्ताने साधलेला हा संवाद. 
 

भूमिका पाटील (प्रताप कॉलेज-अंमळनेर; दिग्दर्शिका-रावीपार) : 
चार वर्षांआधी आम्ही करंडक जिंकलो होतो; त्याच तयारीने आता उतरलो आहोत. या वर्षी गुलजार यांच्या पुस्तकावर आधारित नितीन सावळे यांनी रावीपारचे नाट्य रूपांतर केलेले आहे. ग्रामीण भागातून आलो असलो, तरी नाटकाविषयी तेवढीच आस्था, प्रेम मनात आहे. खानदेशीच मन राखायचा हेच ध्येय डोळ्यासमोर आहे. हिंदू-मुस्लिम फाळणीवर आधारित 'रावीपार' या एकांकिकेत सामाजिक प्रश्नावर दृष्टिक्षेप टाकला आहे. आजही समाजात 'आझादी' आहे, पण 'अमन' नाही त्यासाठी हा विषय निवडला आहे. 

कृष्णा वाळके (न्यू आर्टस, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज-नगर; दिग्दर्शक- माईक) : 
आमच्या कॉलेजला 37 वर्षांपूर्वी करंडक मिळाला. त्यानंतर यंदाचा करंडक पुणे विभागात जिंकलो. माईक म्हणजे जे कामगार स्टेज तयार करतात, त्यांना नेते मंडळी कशी बाजूला सारतात आणि सामान्य माणूस नेहमी जाती-पातीच्या विळख्यात अडकतो हे या वेळचे आकर्षण आहे. मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, त्यामुळे हा करंडक जिंकून आई-वडिलांना आनंद द्यायचे, माझे ध्येय आहे. 

रिषी मनोहर (बृहन्‌ महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स-पुणे; दिग्दर्शक-सॉरी परांजपे) : 
आमच्या कॉलेजमधील अलोक राजवाडेला गणपतराव बोडस हे पारितोषिक मिळाले होते; त्यानंतर दिग्दर्शनासाठी मला प्रथम पारितोषिक मिळाले. स्पर्धा अतिशय तगडी आहे. सगळ्यांचेच विषय अतिशय उत्तम आणि सक्षम आहेत. लाजिरवाणी बाब म्हणजे, गेल्या पाच वर्षांत पुणेकर कोणत्याच संघाने हे बक्षीस मिळविलेले नाही, त्यामुळे जबाबदारीपण आहे. तालीम करताना आम्ही एक कुटुंबच बनलो आहोत. त्यामुळे नाटक आपसूकच रंगतदार होत आहे. 

धनश्री गाडगीळ (श्रीमती नथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय-कोल्हापूर; अभिनेत्री-विवर) : 
विवर हे कथानक माणसांच्या भोवतीच फिरते. एक ब्राह्मण बाई आणि तिची मुस्लीम मैत्रीण (ही भूमिका प्रांजली किन्नरीमठ साकारते) आहे. यात हिंदू-मुस्लिम याविषयी बातचीत करणारी, साधारणपणे संयमी आणि समजूतदार अशी माझी भूमिका असेल. महाअंतिमसाठी भूमिकेचा अभ्यास करताना खूप शिकायला मिळाले आणि त्या प्रक्रियेमध्ये राहिल्याने एक अभ्यास विषय जगला गेला. 

राजेंद्र नांगरे (संयोजक, कलोपासक पुरुषोत्तम करंडक संघ) : रंगीत तालीम करण्यासाठी लाइट, बेसिक मेकअप हे सारे संयोजकांकडून मोफत असते. या वर्षी फडके हॉल, भारत नाट्य मंदिर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची जेवणाची, राहण्याची सोय केलेली आहे. एकूण टीम कशी वागते आणि अभिनय या सर्वांवर निकाल काढला जातो. यंदाचे महाअंतिम फेरीचे 8 वे वर्ष आहे. एक्‍स, देवबाभळी इत्यादी मला भावलेले प्रयोग आहेत. या वर्षीचे विषय तगडे असून समाजाला एक वैचारिक दिशा देणारे आहेत. अतिशय उत्साहात पूर्वतयारी सुरू असून, सर्वांना महाअंतिम फेरीचे वेध लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com