सुमित्रा भावे घराण्याच्या आम्ही आप्त

सुमित्रा भावे घराण्याच्या आम्ही आप्त

पुणे : ''शास्त्रीय संगीतात वेगवेगळी घराणी असतात आणि तिथे आपले आयुष्य कलेसाठी झोकून दिलेले कलावंत पाहायला मिळतात. अगदी तसेच घराणे सुमित्रा भावे यांनी चित्रपटसृष्टीत तयार केले आहे. त्यांच्या घराण्यातही तसेच कलावंत पाहायला मिळतात. अशा घराण्याचे आम्ही आप्त आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी सुमित्रा मावशींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. 

चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनात वेगवेगळे प्रयोग केलेल्या सुमित्रा भावे यांनी वयाची पंचाहत्तरी शुक्रवारी पूर्ण केली. यानिमित्त अरभाट फिल्म, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि सुमित्रा भावे मित्रमंडळ यांच्यावतीने विशेष सोहळा आयोजिण्यात आला होता. यात सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या हस्ते सुमित्रा मावशींचा सत्कार करण्यात आला. त्याआधी कधी त्यांच्या चित्रपटांच्या सादरीकरणातून, तर कधी मान्यवरांच्या मनोगतातून, कधी त्यांनीच रचलेल्या कवितांमधून, तर कधी विद्यार्थ्याने लिहिलेल्या पत्राच्या वाचनातून त्यांची वाटचाल उलगडण्यात आली. ती अनुभवण्यासाठी संग्रहालयाचे सभागृह नव्या-जुन्या पिढीतील कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीने तुडुंब भरले होते. 

मानसोपचारतज्ज्ञ आनंद नाडकर्णी म्हणाले, ''साधेपणा, संथपणा, सामान्यत्व हे तीन गुण सुमित्रा मावशींच्या चित्रपटांत पाहायला मिळतात. त्यातील सौंदर्य गांधी पाहायचे, तसे आहे. म्हणून सुमित्रा मावशी गांधीवादी आहेत. त्यांच्या चित्रपटातील 'सोशल कॉमेंट' फार महत्त्वाची असते. त्यांना स्वीकार दाखवायला आवडतो.'' 

दिग्दर्शक सचिन कुंडलकर म्हणाले, ''एकदा 'सकाळ साप्ताहिक'मध्ये सुमित्रा मावशींचा लेख वाचला. अशी माणसे आपल्या गावात राहतात आणि त्यांना आपण ओळखत नाही, हा विचार मनात कायम घोळत राहिला आणि त्यांची भेट घेतली. त्यांचा संवाद, स्वभाव, आपलेपण यामुळे आमच्यात नाते तयार झाले. त्यांच्यामुळेच मला खरी ताकद मिळाली.'' 

दरम्यान, सुमित्रा मावशींच्या चित्रपटांच्या मूळ संहिता जतन व्हाव्यात म्हणून त्या संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. सुनील सुकथनकर यांनी आभार मानले. 

''माझे वय 75 झाले आहे; पण त्याला फार काही महत्त्व नाही. प्रत्येकाचे वय एक दिवसाचेच असते. त्या दिवसात आपण काय करतो, हे महत्त्वाचे वाटते. एका टप्प्यावर समाजकार्यात रमायचे की कला प्रांतात, हा प्रश्‍न मला पडला होता; पण चित्रपटक्षेत्रात हे दोन्ही सापडले आणि इथेच रमले.'' 
- सुमित्रा भावे, दिग्दर्शिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com