शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी आंदोलन : खासदार सुळे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी आंदोलन : खासदार सुळे

शिर्सुफळ : सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला बाजारभाव दिलेला नाही, फक्त त्यांची दिशाभूल केली आहे. दुधाचे दरही कमी केले आहेत. दुधाला योग्य भाव मिळावा, तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करू, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 

खासदार सुळे यांनी बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील बऱ्हाणपूर, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, सोनवडी सुपे, उंडवडी सुपे, खराडेवाडी या गावांना भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध विकासकामांचे उद्‌घाटन, तसेच नेपतवळण (ग्रामपंचायत बऱ्हाणपूर) येथे आद्यक्रांतीवर उमाजी नाईक समाज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन सुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समिती सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, तालुका महिला अध्यक्षा वनिता बनकर, युवक अध्यक्ष राहुल वाबळे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, पंचायत समिती गटनेते प्रदीप धापटे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. 

उंडवडी सुपे येथील कार्यक्रमात पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची सोय करावी, संत तुकाराम महाराज पालखी तळावर सभामंडप, बाजारतळावर ओटे बांधावे, भानोबा रस्ता मुरुमीकरण, मुंजाबा नगर येथे भूमिगत गटार व कॉंक्रीट रस्ता, अंगणवाडी इमारत, समाज मंदिराला कुंपण, समाज मंदिरासमोर पेव्हरब्लॉक बसविणे, आदी मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायतीमार्फत खासदार सुळे यांना देण्यात आले. या वेळी सरपंच एकनाथ जगताप, उपसरपंच पोपट गवळी, ग्रामसेवक विनोद आटोळे, सदस्या मंगल गवळी, अंजना गवळी, रेणुका गवळी, रंजना गवळी, सुनिता माकर, ज्ञानदेव जगताप, बापूराव गवळी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

नेपतवळण येथे मीरा चांदगुडे यांच्या हस्ते सुळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपसरपंच योगेश जाधव, ग्रामसेवक नवनाथ बंडगर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, तंटामुक्तीचे अध्यक्ष चंदर चांदगुडे, पोलिस पाटील बाळासाहेब गवळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com