"सायबर सिक्‍युरिटी सेंटर'साठी महापालिकेचा पुढाकार 

"सायबर सिक्‍युरिटी सेंटर'साठी महापालिकेचा पुढाकार 

पुणे - पुण्यातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची (आयटी) वाढ आणि त्याला सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले "सायबर सिक्‍युरिटी सेंटर' उभारण्यासाठी आता महापालिका पुढाकार घेणार आहे. हे केंद्र उभारण्यासाठी "डिजिटल' स्वरूपातील पायाभूत सुविधा उभारतानाच महापालिकेच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्याचे नियोजन आहे. खासगी क्षेत्राचे सहकार्य घेऊन ही योजना राबविण्यात येणार असून, त्याकरिता दोन खासगी कंपन्यांनी सहमती दर्शविल्याचे सांगण्यात आले. 

पुणे शहरात "आयटी' उद्योगाची भरभराट होत असल्याने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी "सायबर सिक्‍युरिटी सेंटर' उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2015 मध्ये अमेरिका दौऱ्यावर असताना केली होती. अमेरिकेतील नामांकित कंपनीच्या सहकार्यातून हे केंद्र उभारले जाईल, तसेच वर्षभरात ते कार्यान्वित होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) अधिकारी आणि "आयटी' कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या "हिंजवडी इंडस्ट्रीअल असोसिएशन'च्या (एचआयए) पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन प्राथमिक चर्चाही करण्यात आली होती; पण केंद्राच्या उभारणीसाठी नेमक्‍या सेवा-सुविधा उभारणे शक्‍य न झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. तसेच, राज्य सरकारच्या "आयटी' धोरणातही त्याचा साधा उल्लेखही करण्यात आला नव्हता. या पार्श्‍वभूमीवर "आयटी'तील जागतिक पातळीवरील कंपन्यांना सुरक्षिततेबाबत विश्‍वासार्हता देण्यासाठी "सायबर सिक्‍युरिटी सेंटर' उभारण्याची मागणी "एचआयए'चे माजी अध्यक्ष अनिल पटवर्धन यांनी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, याबाबतचा प्रस्ताव पडून राहिला होता. 

दरम्यान, शहरात आयटी उद्योगाचा विस्तार व्हावा, यासाठी महापालिकेनेही वेगवेगळ्या पातळ्यांवर योजना आखण्यास सुरवात केली आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात "आयटी'ला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार "सायबर सिक्‍युरिटी सेंटर' उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, या केंद्रासाठी जागा आणि अन्य सेवा-सुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील पंधरा दिवसांत होईल. खासगी क्षेत्रातील "कोहिनूर ग्रुप'ने प्रस्ताव तयार केला आहे. 

स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ म्हणाले, ""रोजगारनिर्मिती होत असल्याने "आयटी'ला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यासाठी "सायबर सिक्‍युरिटी सेंटर'च्या योजनेला गती देण्याचा प्रयत्न आहे. केंद्राच्या उभारणीमुळे जगभरातून "आयटी' कंपन्या पुण्याकडे आकर्षित होतील.'' 

""पुण्यातील "आयटी' उद्योगातील निरनिराळ्या संगणक प्रणालीसाठी (सॉफ्टवेअर) सुरक्षितता पुरविली पाहिजे. मात्र, स्थानिक पातळीवर तशी सुविधा नसल्याने कंपन्यांना ती अन्य देशांतून घ्यावी लागते. ही सुविधा पुण्यात निर्माण केल्यास "आयटी'चा विस्तार होण्यास मदत होईल. त्याकरिता सहकार्य करण्याचा प्रस्ताव आहे,'' असे कोहिनूर ग्रुपचे सहकार्यकारी संचालक विनीत गोयल यांनी सांगितले. 

सर्व्हर, डाटाची सुरक्षितता महत्त्वाची 
पुणे शहर आणि परिसरात तीन सार्वजनिक आयटी पार्क आहेत. त्यात, या क्षेत्रातील दोनशेहून अधिक मोठ्या कंपन्या आहेत. निरनिराळ्या छोट्या-मोठ्या उद्योगांना सेवा पुरविण्यासाठी कंपन्या नवी संगणकप्रणाली विकसित करीत असतात. त्यामुळे संबंधित "सर्व्हर' आणि माहिती (डाटा) सुरक्षितपणे साठवून ठेवणे कंपन्यांसाठी महत्त्वाचे असते. मात्र, पुण्यात ती सुविधा नसल्याने या उद्योगाला परदेशातील कंपन्यांकडून सुरक्षितता घ्यावी लागत आहे; पण स्थानिक पातळीवर सायबर सिक्‍युरिटी सेंटर निर्माण केल्यास "आयटी'ला चालना मिळेल, असे "एचआयए'चे माजी अध्यक्ष अनिल पटवर्धन यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com