त्याच्या चित्रांना मिळतेय अनोखी दाद 

त्याच्या चित्रांना मिळतेय अनोखी दाद 

पुणे - कुठे गणपती बाप्पाचे चित्र, तर कुठे छोटा भीम... कुठे फुलपाखरू, तर कुठे छोटेसे घर... छोट्याशा आरुष गिरमकर याने रेखाटलेल्या चित्रांची ही अनोखी दुनिया प्रदर्शन पाहायला येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला भिडली. कागदरूपी कॅनव्हासवर रंगांची मुक्त उधळण करत आरुषने साकारलेल्या बहुविध चित्रांनी प्रत्येकाची दाद मिळवलीच; पण वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी चित्रांचे हे जग साकारणाऱ्या आरुषचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता. कलेला वयाचे बंधन नसते... मनात दडलेल्या चित्रांना मूर्तरूप दिले की चित्रकार घडतो असेच काहीसे त्याला पाहून प्रत्येकाला वाटले. 

आरुषच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते रविवारी झाले. चित्रकार आणि बालसाहित्यिक ल. म. कडू, लेखक महावीर जोंधळे, रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे, कवी उद्धव कानडे, माधव राजगुरू, रवींद्र सातपुते, प्राजक्ता सातपुते, राहुल गिरमकर या वेळी उपस्थित होते. आरुषने वयाच्या अवघ्या दीड वर्षापासून चित्रकलेला सुरवात केली. त्याने आतापर्यंत सुमारे 450 चित्रे रेखाटली असून, त्यांतील निवडक शंभर चित्रे प्रदर्शनात मांडली आहेत. 

कुलकर्णी म्हणाले, ""चित्रकला ही अभिव्यक्ती आहे. पण, मुलांमध्ये दडलेल्या चित्रकाराला पालक वाटच देत नाहीत. चित्रकलेच्या क्‍लासमध्येच चित्र काढायला शिकता येते, ही मानसिकता बाजूला सारा. आज चित्रकलेचे वर्ग केवळ छंदवर्गांपुरते उरले आहेत. मुलांच्या सर्जनशीलतेला वाव द्या. पाल्याला चित्रकलेच्या वर्गांना पाठविण्यापेक्षा त्याच्यातील चित्रकाराला घडू द्या. शिक्षकांनी मुलांच्या चित्रकलेचे निरीक्षण करून त्यांची शैली विकसित करण्यात हातभार लावला पाहिजे.'' 

कडू म्हणाले, ""या प्रदर्शनात मांडलेल्या चित्रांतून लहान मुलांच्या कल्पनाशक्तीचा प्रत्यय येतो. लहान मुलांच्या चित्रकलेत ढवळाढवळ न करण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन पालकांसाठी देखील एक धडा आहे. वास्तववादी चित्रकला म्हणजेच खरी चित्रकला, ही संकल्पना फोल आहे. चित्रकला ही एक भाषा आहे. मुलांना पालक गृहीत धरतात. पालकांनी हे गृहीत धरणे सोडल्यास खरे चित्रकार तयार होतील.'' 

हे प्रदर्शन सोमवारपर्यंत (ता. 26) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे पाहावयास खुले राहील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com