मानसशास्त्र ही अभिनयाची शाळा - डॉ. आगाशे

मानसशास्त्र ही अभिनयाची शाळा - डॉ. आगाशे

पुणे - नाटक, चित्रपट व मानसशास्त्र यांचा घनिष्ठ संबंध आहे. मी माझ्या पेशंटकडून अभिनय शिकलो, त्यामुळे मानसशास्त्र ही अभिनयाची शाळा आहे, असे मत डॉ. मोहन आगाशे यांनी रविवारी व्यक्त केले.

बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘मानसिक आरोग्याचा ५० वर्षांतील एक प्रवास’ या विषयावर ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, डॉ. उल्हास लुकतुके आणि डॉ. विद्याधर वाटवे या तिघांशी त्यांच्या वाटचालीबद्दल डॉ. आनंद नाडकर्णी यांनी संवाद साधला. या वेळी डॉ. आगाशे यांनी काही रुग्णांच्या समस्या सहअभिनय दाखविल्या. या वेळी उपस्थितांनी हशा, टाळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

डॉ. आगाशे म्हणाले, ‘‘बारावीला चुकून जास्त टक्के मिळाले. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा निर्णय झाला. मानसशास्त्र म्हणजे नेमके काय याची उत्सुकता आणि रस होता म्हणून ‘मानसोपचार तज्ज्ञ’ व्हायचा निर्णय घेतला. मन हा शरीराचा लाडूचा डबा आहे, त्यामध्ये लाडू नसतील तर डब्याचा उपयोग नाही; तसेच मनाशिवाय शरीराचा उपयोग नाही. मानवी वर्तणुकीचा अभ्यास करण्याचे कुतूहल होते. विद्यार्थिदशेपासून प्रत्यक्ष काम करीत असताना जे जे मानसिक रुग्ण भेटले, त्यांच्या निरीक्षणातून मी अभिनय शिकलो किंबहुना एखादी भूमिका कशी वटवावी याचा प्रत्यय ‘प्रॅक्‍टिस’ करताना आला. पुरुषोत्तम करंडकासाठी केलेल्या एकांकिकेमुळे अभिनय क्षेत्र न सोडण्याचा निर्णय पक्का केला. जाणीव व नेणीवेच्या पातळीवर मानसशास्त्र काम करतो. त्यामुळे मला आयुष्यात ‘प्रॅक्‍टिस’सह अभिनयाचा छंदही जोपासता आला.’’  

डॉ. वाटवे म्हणाले, ‘‘मानसशास्त्राला ‘इमर्जन्सी’ नसते, रात्रीअपरात्री उठावे लागत नाही, म्हणून मानसोपचार तज्ज्ञ होण्याचा निर्धार मी केला. महाविद्यालयीन काळात आमच्या एका प्राध्यापकांना ‘सिग्मंड फ्रॉईड’ तोंडपाठ होता. त्यामुळेदेखील मला मानसोपचार तज्ज्ञ होण्याची इच्छा बळावली; तसेच मोहन आगाशे यांच्यामुळे मी ‘प्रॅक्‍टिस’शिवाय वैद्यकीय क्षेत्रात शिक्षक आणि व्याख्याता बनलो तो माझ्या आयुष्यातील ‘यू टर्न’ होता.’’ 

तसेच डॉ. लुकतुके म्हणाले, ‘‘महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून, पुस्तकांच्या माध्यमातून ‘सिग्मंड फ्रॉईड’ची ओळख झाली. त्यामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात आल्यानंतर मानसशास्त्र हा प्राधान्याचा विषय ठेवला. आचार्य रजनीश यांच्या व्याख्यानामुळे रुग्णांना औषधांसह शब्दांनीदेखील बरे करता येते, याबद्दल प्रत्यक्ष अनुभूती आली.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com