पुण्याचा मानबिंदू एम्प्रेस गार्डनचा लचका तोडण्याचा सरकारी डाव 

पुण्याचा मानबिंदू एम्प्रेस गार्डनचा लचका तोडण्याचा सरकारी डाव 

पुणे  - तब्बल दोनशे वर्षांचा महाकाय वड, एखाद्या वृक्षाच्या खोडाएवढी जाडी असलेला दुर्मिळ कांचनवेल यांसह सुमारे अठराशे देशी-परदेशी वृक्षांची संपदा असलेल्या दीडशेहून अधिक वर्षे जुन्या एम्प्रेस गार्डन या पुण्याच्या मानबिंदूचा लचका तोडण्याचा आणि त्यातील दहा एकर जागेवर शासकीय निवासासाठी इमारती बांधण्याचा डाव राज्य सरकारने रचला आहे. पुण्याच्या या वैभवावर कुऱ्हाड मारण्याचा हा आतापर्यंतचा तिसरा मोठा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ब्रिटिशकालीन एम्प्रेस गार्डनच्या मूळच्या 55 एकर जागेचे लचके तोडण्यात आल्याने आता ती सदतीस एकर उरली आहे. हे वैभवही टिकावे अशी राज्य सरकारची इच्छा नसावी, कारण त्यातील तब्बल साडेदहा एकर जागेवर इमारती बांधण्याची योजना सरकारने आखली आहे. या जागेवर तीन शासकीय इमारती बांधण्यात येणार असून, त्यामध्ये सरकारी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी; तसेच न्यायाधीशांसाठी निवासस्थान म्हणून त्यांचा वापर करण्यात येईल. यासाठी निविदा प्रक्रियाही करण्यात आली असून, त्यासाठी चार कोटी 85 लाख रुपये खर्च येणार आहे. 

एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन तब्बल सव्वाशे वर्षांपासून "ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया' ही नामवंत संस्था पाहात आहे. या काळात संस्थेला उद्यान सांभाळताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मूळ बागेतील काही जागा रस्ते-कालवे यासाठी द्यावी लागली. त्यानंतर टर्फ क्‍लबला चार एकर जागा घोड्यांचे तबेले बांधण्यासाठी देण्यात आली. एवढे झाल्यानंतर वन खात्याने संशोधन करण्यासाठी काही जागा मागितली. ""वन खात्याच्या ताब्यातील या जागेवर संशोधन केंद्राचा फलक आहे, मात्र तिथे कोणतेच संशोधन होताना दिसत नाही,'' असे निरीक्षण संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे नोंदवतात. याखेरीज मागे कॅंटोन्मेंट न्यायालयासाठीही उद्यानाची जागा मागण्याचा प्रयत्न झाला होता, अशी आठवणही ते सांगतात. 

सरकारी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी निविदा काढण्यापर्यंतची प्रक्रियाही सुरू होईपर्यंत ती जागा ताब्यात असलेल्या "ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया' या संस्थेला त्याचा पत्ताच नव्हता. या संस्थेला सरकारचा हा पराक्रम समजला तो 29 जानेवारीला पाठविलेल्या एका पत्राने. "सदर जागेवर शासकीय निवासस्थाने बांधण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून इमारतीचा पाया विविध भूस्तरावरील भारक्षमता जाणून घेण्यासाठी बोअर होल घेण्यात येणार आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर बोअर होल घेण्यासाठी सहकार्य करावे,' असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे पत्र संस्थेला आले. 

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या पत्राने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धक्काच बसला. संस्थेचे अध्यक्ष राहुलकुमार बजाज, उपाध्यक्ष प्रतापराव पवार आणि मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून उद्यानाच्या जागेवर बांधकाम न करण्याची विनंती केली आहे. "संस्थेकडून उद्यानाचे व्यवस्थापन करण्यात येत असून, त्याचे रूपांतर जागतिक वनस्पती उद्यानात (बोटॅनिकल गार्डन) करण्याची आमची योजना आहे, त्यासाठी या उद्यानात दरवर्षी सुमारे शंभर नवे आणि दुर्मिळ जातींचे वृक्ष लावण्यात येतात. तसेच सरकारने बांधकाम करण्याची योजना आखलेल्या जागेवरही झाडे लावण्याचे संस्थेचे नियोजन आहे,' असे या पत्रात संस्थेने नमूद केले. मुख्यमंत्री या विनंतीबाबत सकारात्मक भूमिका घेतील, अशी या पदाधिकाऱ्यांना आशा आहे. 

याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारती बांधकाम उपविभागाशी संपर्क साधला असता, "वरिष्ठांच्या आदेशानुसार निविदा प्रक्रिया सुरू आहे,' असे उत्तर देण्यात आले. 

एम्प्रेस गार्डनच्या दीडशे वर्षांतील टप्पे - 
- सुमारे 1818 नंतरच्या काही वर्षांनी - ब्रिटिश सैनिकांच्या विश्रांतीसाठी उभारलेल्या बागेला "सोल्जर्स गार्डन' असे नाव 
- 1887 - व्हिक्‍टोरिया राणीच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने बागेचे "एम्प्रेस गार्डन' असे नामकरण 
- 1892 - मुंबईत 1830 मध्ये स्थापन झालेल्या आणि तेथे राणीचा बाग-वस्तुसंग्रहालय उभारलेल्या आणि पुण्यातील खडकीत वनस्पती उद्यान उभारलेल्या "ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया' या संस्थेकडे एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन सुपूर्त 
- 1947 म्हणजे स्वातंत्र्यानंतर सी. डी. देशमुख संस्थेच्या अध्यक्षपदी, त्यांच्यानंतर सांगलीचे महाराज, मोहन धारिया, शंतनूराव किर्लोस्कर आणि राहुलकुमार बजाज (विद्यमान) आदींनी भूषविले अध्यक्षपद 
- 1970 च्या आसपास "टर्फ क्‍लब'ला घोड्यांच्या तबेल्यांसाठी चार एकर जागा 
- 1972 - आर्थिक अडचणींतून मार्ग काढण्याचा संस्थेच्या बैठकीत निर्धार आणि मानद सचिवपदी सुरेश पिंगळे यांची नियुक्ती, त्यानंतर प्रदर्शने-वृक्षसंवर्धन आदी विविध उपक्रमांनी उद्यान बनले पर्यटकांचे आकर्षण 

वैशिष्ट्यपूर्ण वृक्षसंपदा 
अर्ध्या एकरावर विस्तार असलेला कांचनवेल, किनई, धावडा, कळम, सीतेचा अशोक, कुसुंब, बेगर्स बाउल, चांदणंवावळ, मुचकुंद, टेमरू, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, बेहडा, मास्ट ट्री, महोगनी, मोह, बांबूंचे जायंट-बुद्धास बेली-हिरवा-पिवळा असे प्रकार, मलेशियन ऍपल, बिबा, चक्राशिया, नांद्रुक, रुद्राक्ष, रक्तरोहिडा, समुद्रशोक, उर्वशी मेढशिंगी, गोरख चिंच, जांभूळ, आंबा, चेरी आदी अनेक जाती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com