दरोडेखोरांना १२ तासांत अटक

दरोडेखोरांना १२ तासांत अटक

पुणे - रविवार पेठेतील सराफाच्या दुकानावर भर दिवसा दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींपैकी चार जणांना पुणे पोलिसांनी अवघ्या १२ तासांतच मुसक्‍या आवळल्या. नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या या आरोपींचा अविश्रांत तपास करून पोलिसांनी गुजरातमधील वापी येथे त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० लाख रुपयांचे ६५० ग्रॅम सोने जप्त केले.

मनीष गोविंद स्वार (वय २५, रा. नाना पेठ), देवेंद्र बहादूर कुंवर (वय २७, रा. कोंढवा), प्रकाश करण खडका (वय २७, रा. नाना पेठ), मनोज मंगल बगोटी (वय २१, रा. ताडदेव मुंबई) या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामधील भरत बिका व गोकुळ खडका हे दोघे फरारी आहे. सर्व जण मूळचे नेपाळ येथील रहिवासी आहेत. 

बुधवारी दुपारी साडेतीन वाजता या सहा जणांनी कोयत्याचा धाक दाखवून रविवार पेठेतील ‘पायल गोल्ड’ या सराफा दुकानातील आठशे ग्रॅम सोने व रोख रक्कम मिळून २४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला होता. या घटनेमुळे सराफी व्यावसायिकांमध्ये घबराट पसरल्याने त्याचा तत्काळ तपास लावणे पोलिसांच्या दृष्टीने आव्हान होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तपासाला गती मिळाली. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथक एक, दोन, दरोडा प्रतिबंधक, खंडणीविरोधी पथकासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला.

..असा केला तपास
रास्ता पेठेतील एका सराफा दुकानात कारागीर असलेल्या गोकुळ सागर ओड (वय २० रा. गंजपेठ) याने संबंधित दुकानातील सोन्याची माहिती देत दरोड्याचा कट रचला. त्यानुसार सहा जणांनी हा दरोडा टाकला. त्यानंतर सर्व जण खासगी ट्रॅव्हल्सने मुंबई आणि तेथून नेपाळकडे पलायन करत होते. सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवीत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. त्यानुसार माग काढत पोलिस मनीषच्या घरापर्यंत पोचले. तेथे त्याची पत्नी व भाऊ कारने मुंबईमार्गे नेपाळला निघाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सानपाडा पोलिसांना कळवून तेथील पुलावर संबंधित गाडी पकडली. त्यामध्ये मनीषच्या पत्नीने सर्व आरोपी रेल्वेने नेपाळकडे निघाल्याचे सांगितले. समीर शेख यांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. मुंबई येथून डेहराडून एक्‍स्प्रेस (१९०१९) या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या सर्व आरोपींना पकडण्याच्या सूचना रेल्वे पोलिसांना केल्या. रेल्वे पोलिसांनी प्रत्येक स्थानकावर पोलिस तैनात केले. गाडी गुजरातमधील वापी स्थानकावर पोचताच पोलिसांना एका आरोपीची ओळख पटली. रेल्वे पोलिसांनी त्याच्यासह अन्य तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर शेख यांच्या पथकाने वापी येथे जाऊन आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. 

अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे व गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती दिली. समीर शेख, पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सतीश निकम, राजेंद्र निकम यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बक्षिसासाठी शिफारस करणार
समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांना बक्षीस मिळावे, यादृष्टीने पोलिस आयुक्तांकडे शिफारस करणार असल्याचे डहाणे यांनी स्पष्ट केले. 

‘‘पुणे पोलिसांनी थोडीशीही उसंत न घेता, या गुन्ह्याची उकल केली. इतक्‍या कमी वेळेत व प्रामाणिकपणे काम करून आरोपींना ताब्यात घेतले. आम्हाला पुणे पोलिसांचा खरोखरच अभिमान वाटतो.’’ मनोज जैन व लॉईड फॅरो, सराफ व्यावसायिक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com