बसच्या डिकीत सामान ठेवताय सावधान! 

बसच्या डिकीत सामान ठेवताय सावधान! 

पुणे  - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवनेरी, शिवशाहीसारख्या वातानुकूलित बस किंवा खासगी बसच्या डिकीमध्ये तुम्ही आपल्या बॅग, वस्तू ठेवताय? तर मग जरा सांभाळून आणि काळजीपूर्वकच. कारण प्रवासी किंवा बसच्या चालक, वाहकाचे लक्ष विचलित होताक्षणी डिकीत ठेवलेल्या तुमच्या बॅग, वस्तू चोरी करणारी टोळी सध्या सक्रिय झाल्याचे चित्र आहे. याबाबतची घटना नुकतीच स्वारगेट स्थानकामध्ये घडली आहे. त्यामुळे प्रवाशांनी जरा जास्तच काळजी घेण्याची गरज आहे. 

स्वारगेट बस स्थानकातून शिवनेरीमधील बॅग चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी अशोक चित्रे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याविषयी पोलिस निरीक्षक फारुख काझी म्हणाले, ""चित्रे हे शिवनेरी बसने ठाण्याला जाण्यासाठी निघाले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या दोन बॅगा बसच्या डिकीमध्ये ठेवल्या. त्यानंतर दोघेही बसमध्ये जाऊन बसले. ठाणे येथे बसमधून उतरल्यानंतर डिकीत बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंबंधी त्यांनी तेथील नियंत्रकाकडे तक्रार केली, तर नौपाडा व स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.'' 

अनेक घटनांची नोंदच नाही 
स्वारगेट बस स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रणामध्ये तपास केला असता चित्रे यांची बॅग चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला. चित्रे हे बॅग ठेवून बसमध्ये बसले. बसचालक डिकी पाहून पुढे गेला. त्या वेळी दोन जणांनी अवघ्या काही मिनिटांतच डिकीतील बॅग पळविल्याचे दिसून आले. यापूर्वीही अशा घटना घडल्याची शक्‍यता असून बोटावर मोजण्याइतक्‍याच घटनांची पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे नको, म्हणून अनेक जण फिर्याद देण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. परिणामी चोरांना मोकळे रान मिळत असल्याची सद्य-स्थिती आहे. 

बसथांब्यांवर बॅगा लंपास 
शहरामध्ये स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानकासह ठिकठिकाणी शिवनेरी, शिवशाही किंवा खासगी बसचे थांबे आहेत. या ठिकाणी प्रवासी घाईगडबडीत आपल्या बॅगा, वस्तू डिकीत टाकून बसमध्ये बसतात. बस सुरू होईपर्यंत अन्य प्रवासी येणे सुरू असल्याने त्यांच्याही बॅग डिकीत ठेवल्या जातात. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांकडून बॅग लंपास करण्याचा प्रकार बस थांब्यांवर घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याचे वास्तव आहे. 

"स्टॅंड ड्यूटी'वरील पोलिसांचे दुर्लक्ष 
स्वारगेट एस. टी. थांब्यावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही वर्षांपासून दोन पोलिसांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांनी संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे; परंतु आत्तापर्यंत कधीच ठोस कारवाई झालेली नाही. 

चोरट्याचा शोध घेण्यास विलंब का? 
शिवनेरीमधील बॅग चोरीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला. तरीही पोलिसांना आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे चोरीच्या घटनांना लगाम लागत नसल्याची सद्य-स्थिती आहे. अद्याप ठोस प्रयत्न होत नाही. 

स्वारगेट बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही बसविले आहेत. चोरांवर कारवाई करणे पोलिसांचे काम आहे. त्यादृष्टीने काही वर्षांपासून "स्टॅंड ड्यूटी' पोलिसही स्थानकावर ठेवले आहेत. तरीही हा चोरीचा प्रकार घडला आहे. प्रवाशांनी आपल्या बॅग, मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक सांभाळाव्यात, यासाठी सातत्याने घोषणाही केली जाते. 
- श्रीनिवास जोशी, पुणे विभागीय नियंत्रक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com