नियोजित पुरंदर विमानतळाचे महत्त्व "एमएसडब्ल्यू'धारकांमार्फत पटविणार 

नियोजित पुरंदर विमानतळाचे महत्त्व "एमएसडब्ल्यू'धारकांमार्फत पटविणार 

पुणे - सामाजिक सेवा विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांकडून (एमएसडब्ल्यू) पुरंदर येथील नियोजित विमानतळ प्रकल्पात येणाऱ्या गावातील लोकांशी संवाद साधला जाणार आहे. या प्रकल्पाचे महत्त्व, त्याची संकल्पना आणि या मागची राज्य सरकारची बाजू गावकऱ्यांपर्यंत सहजतेने पोचविण्यासाठी ही पदवी घेतलेल्या मुलांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी या मुलांना या प्रकल्पाची माहिती देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. 

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाच्या कामाची लवकरच सुरवात होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या प्रकल्पाचे महत्त्व या गावातील नागरिकांना सहजतेने समजेल अशा पद्धतीने सांगण्यासाठी आणि या प्रकल्पामागची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी काही खासगी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. त्या बाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. 

या बाबत माहिती देताना राव म्हणाले, ""समृद्धी कॉरिडॉरमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी) खासगी संस्थेची मदत घेतली आहे. त्याच धर्तीवर पुरंदरमधील विमानतळाच्या प्रकल्पाची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी "एमएसएब्ल्यू' पदवीधारकांची मदत घेण्यात येत आहे. या प्रकल्पाबाबत प्रत्येक गावात जाऊन सरकारची भूमिका त्यांच्या मदतीने स्पष्ट केली जाणार आहे. ही पदवी घेतलेली मुले बाहेरगावाहून आली असल्याने त्यांचा कोणताही स्वार्थ यात नसतो. या भागातील कोणाशीही त्यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नसतो. खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातील प्रत्येक शंकांचे समाधान करणे आणि राज्य सरकारची या प्रकल्पामागची भूमिका स्पष्ट करण्याचे काम ही मुले करणार आहेत.'' 

राज्य सरकारकडे त्यासाठी 25 खासगी कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना सासवड विमानतळ प्रकल्पाची संकल्पना समजावून दिली जाणार आहे. त्यांना या प्रकल्पाचे महत्त्व समजावून दिले जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक प्रशिक्षणदेखील त्यांना देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com