सरकार बेरोजगारी वाढवत आहे : अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

बारामती : राज्य सरकार अनेक पदे रद्द करुन बेरोजगारी वाढवत आहे. लोकांच्या हाताला काम देण्याऐवजी त्यांचे काम हिरावून घेण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) केला. शहरातील एका हॉटेलच्या उद्घाटननिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. 

अजित पवार म्हणाले, देशाप्रमाणेच राज्यातही सर्व स्तरातील लोकांमध्ये कमालीच्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने विदर्भात फिरताना लोकांची परिस्थिती काय आहे हे लक्षात आले. कर्जमाफी करताना उशीर लागत आहे कारण आम्ही काळजी घेऊन व्यवस्थित काम करतो आहे असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. मात्र, शिवसेनेच्या एका आमदाराच्या खात्यावर त्याने कर्जमाफीची मागणी केलेली नसतानाही 25 हजारांची रक्कम जमा झाली, हे कशाचे द्योतक आहे.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हातांना काम वाढविण्याऐवजी 30 टक्के नोकरकपात करण्याचा चुकीचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे सांगून पवार म्हणाले, की वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात कामही वाढते आहे. अनेक हातांना काम देण्याचे बाजूला ठेवून राज्य शासन आहे, त्यांनाच बेकार करायला निघाले आहे. 

ऊसाच्या भावाचा यक्ष प्रश्न सध्या ऊस उत्पादकांपुढे आहे, तर दुसरीकडे साखरेचे भाव 3700 रुपयांवरुन 3100 रुपयांपर्यंत घसरले आहेत. बोंड अळीचा प्रश्न, ओखी वादळाने पिकांचे झालेले नुकसान असे अनेक प्रश्न आज शेतकऱ्यांपुढे आहेत, त्याचा राज्य शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज पवार यांनी बोलून दाखविली. 

साखरेच्या भावात होणारी घसरण विचारात घेत सरकारने यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केलेली असल्याची माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली. 

तसेच बारामती शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी लवकरच उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक नियंत्रक दिवेही लवकरच सुरु केले जाणार असून, नागरिकांनी शिस्त पाळावी असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com