'शिक्षक'क्षेत्रात अजूनही पवारसाहेबच पॅावरफुल

संतोष शेंडकर
शनिवार, 20 जानेवारी 2018

सोमेश्वरनगर : शिक्षकांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलने केली, मोर्चे काढले, अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या, मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले पण फारसा उपयोग झाला नाही. अखेर पुन्हा एकदा संघाने 'पवारसाहेब' यांनाच साकडे घातले आहे. शिक्षक संघाला सरकारपेक्षा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचाच आधार वाटत असल्याचे पुण्यात रविवारी (ता. 21) होणाऱ्या शिक्षणपरिषदेवरून दिसून येत आहे. 

सोमेश्वरनगर : शिक्षकांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलने केली, मोर्चे काढले, अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या, मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले पण फारसा उपयोग झाला नाही. अखेर पुन्हा एकदा संघाने 'पवारसाहेब' यांनाच साकडे घातले आहे. शिक्षक संघाला सरकारपेक्षा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचाच आधार वाटत असल्याचे पुण्यात रविवारी (ता. 21) होणाऱ्या शिक्षणपरिषदेवरून दिसून येत आहे. 

राज्यात प्राथमिक शिक्षक संघ आणि शिक्षक समिती या दोन प्रबळ संघटना आहेत. गेली अनेक वर्ष 'संघ' रचनेवर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा प्रभाव असल्याचे जाणवते. त्यांनी मुख्यमंत्री असताना शिक्षक संघाला पुण्यात शिक्षणसंस्थांच्या व वसतीगृहाच्या उभारणीसाठी एक एकर जागा मिळवून देण्यास मदत केली होती. संघाने माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालय, मराठी व इंग्रजी प्राथमिक शाळा, वसतिगृह उभारली आहेत.

या संस्थांचा रौप्यमहोत्सव यावर्षी पार पडत आहे. यानिमित्ताने संघाने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर येथे उद्या सकाळी दहा वाजता शिक्षणपरिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत राज्य व जिल्हा पातळीवरील प्रश्नांबाबत काही मागण्या केल्या आहेत.

परंतु या मागण्या मांडण्यासाठी एकही सरकारचा एकही प्रतिनिधी निमंत्रित केलेला नाही. संबंधित खात्याचे मंत्री, पालकमंत्री सोडा पण भाजपा-शिवसेनेच्या आमदारालाही बोलावण्यात आलेले नाही. रासपचे राहुल कुल यांचाच फक्त अपवाद आहे. महत्वाचे म्हणजे काँग्रेसच्या मंडळींनाही पाचारण केलेले नाही.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे शिक्षणपरिषदेच्या निमित्ताने शिक्षक संघ पुन्हा 'राष्ट्रवादी'मय झाल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेत असताना शिक्षक संघाच्या प्रतिनिधींचे आणि संबंधित मंत्र्यांचे 'जिव्हाळ्याचे' संबंध होते. शिक्षकांचे भले-बुरे प्रश्न सोडवून घेतले जात होते. 

परंतु आता भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यापासून शिक्षकांचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढत आहेत. बदल्यांसह अनेक प्रश्नांवर आंदोलने, मोर्चे, धरणे, न्यायालयीन लढाई झाली परंतु यश मिळाले नाही. मंत्र्यांना साकडे घालून उपयोग झाला नाही. अधिकारी संवादास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर शिक्षक मोठ्या संख्येने काँग्रेस-राष्ट्रवादीला मानणारे असल्याचा समज असल्याने सरकार जाणीवपूर्वक 'विनोदी' व 'असिमानंद' भूमिका घेत असल्याचे शिक्षकांचे मत झाले आहे. त्यामुळे पुन्हा जुन्याच 'राष्ट्रवादी' वळचणीला जाण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे समजते.

याबाबत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, पवारसाहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी संस्थांना मदत केल्याने आज शिक्षक संघटना मजबूत आहे. ते विरोधी पक्षात असले तरी त्यांना आमचे म्हणणे समजते. ते पॅावरफुल नेते आहेत. सगळे राष्ट्रवादीचेच लोक बोलावण्याचे कारण साहेबांनी मदत केलेल्या संस्थांचा रौप्यमहोत्सव हे आहे.

Web Title: marathi news Pune News Baramati News Sharad Pawar