विकासकामांबाबत दक्ष; कुटुंबीयांकडेही लक्ष

Corporator
Corporator

पुणे - पन्नास टक्‍क्‍यांचे आरक्षण आले, त्यातून कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या महिला राजकारणात आल्या, नगरसेविका झाल्या. महापालिका येथील प्रशासन, राजकारण यांचा काहीच संबंध नसणाऱ्या या ‘नगरसेविका’ महापालिकेत स्थिरावल्या आहेत. वर्षभरात महापालिका समजून घेऊन, त्या आता कामकाज करू लागल्या आहेत. सभागृहात पदार्पण करून त्यांना गुरुवारी (ता. १५) एक वर्ष पूर्ण होत आहे, या पार्श्‍वभूमीवर काही नगरसेविकांच्या या प्रातिनिधिक भावना... 

अमृता बाबर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) - माझे पती अजित राजकारणात सक्रिय असल्याने आमचे कुटुंब राजकीय क्षेत्रात ओळखले जाऊ लागले. कात्रज परिसरात त्यांचे काम मोठे होते. तेव्हा माझ्याकडे केवळ घरातील मुले आणि स्वयंपाकघराची जबाबदारी होती. २०१६ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यामुळे मला राजकारणात उतरविण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. महापालिकेच्या सभागृहात आल्यानंतर सुरवातीला काही महिने कामकाज समजून घेतले. त्यानंतर हळूहळू लोकांचे प्रश्‍न मांडले. सर्वसाधारण सभा आणि पक्षाच्या बैठकांना हजर राहवून काही नवे शिकण्याचा प्रयत्न करीत असते. घरातील मंडळी मला समजूनही घेतात. पण ‘त्यां’चे नसणे अधिक जबाबदारी देऊन गेल्याची जाणीव आहे. 

प्राची आल्हाट (शिवसेना) - माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. संगणक शास्त्राची (कॉम्प्युटर सायन्स) पदवी घेतल्यानंतर मी व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची तयारी करीत होते. तेवढ्यात २०१६ मध्ये लग्न झाले. त्यानंतरही माझे शिक्षण सुरूच राहिले. माहेर आणि सासरचेही सामान्य कुटुंब. घरातील मंडळी नोकरदार. त्यामुळे राजकारणाची कोणालाच आवड नव्हती. पण, सभागृहातील अन्य नगरसेवकांची मांडणी पाहून मीही त्या पद्धतीने काम करीत आहे. ज्यामुळे माझ्या कार्याला गती येत आहे. ज्येष्ठ नगरसेवकांची भाषणे ऐकण्याकडे माझा कल असतो. त्यातून अनेक गोष्टी शिकता येतात. शहराच्या महत्त्वाच्या विषयांवर सभागृहात माझे म्हणणे मांडते. राजकारणात येऊन चांगली कामे करीत असल्याचा आनंद आहे. 

राजश्री काळे (भाजप) - माहेर आणि सासरही सोलापूर जिल्ह्यातील. लग्नानंतर नोकरीच्या शोधात पुण्यात आले आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शिपाई म्हणून काम मिळाले. दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने नोकरीशिवाय पर्याय नव्हता. ती करीत असताना पारधी समाजातील लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्न करीत होते. सभागृहात आल्यापासून दोन अर्थसंकल्प मांडले गेले, त्याचा अभ्यास केला. नगरसेविका असूनही कुटुंबातील सगळी कामे पार पाडते. माझ्याकडे मोलकरीण नाही. मुलांचा डबा, त्यांची शाळा, अभ्यासाकडे बारकाईने लक्ष देते.

अश्‍विनी लांडगे (एमआयएम) - गेली दहा-बारा वर्षे केवळ घरापुरतीच मर्यादित राहिल्याने महापालिका, तिच्या निवडणुकीबाबत फारशी माहिती नव्हती. पण, निवडून आल्यानंतर सभागृहात पाय ठेवला तेव्हापासून प्रभाग नव्हे, तर शहर समजून घेता आले. त्यातून महिला सक्षमीकरणाच्या योजना राबविण्याच्या माझ्या प्रयत्नांना बळ मिळाले. प्रभागातील कोणत्या योजनांसाठी किती आर्थिक तरतूद करावी, याचे धडे घेतले. ज्यामुळे प्रभागातील छोटी-मोठी कामे मार्गी लागली. पक्षाचे गटनेतेपद माझ्याकडे असल्याने संपूर्ण शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत माझा सहभाग असतो. त्याचेही मला समाधान आहे. सभागृहाचे कामकाज कळू लागले आहे. त्याचा फायदा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com