डीएसके कोठडीत चक्कर येऊन कोसळले; ससून रुग्णालयात दाखल

DSK
DSK

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) शनिवारी रात्री पोलिस कोठडीत चक्कर येऊन कोसळले. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना शनिवारी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीत अटक केली. सायंकाळी विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी त्यांची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास पोलिस कोठडीत त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळेले. पोलिसांनी त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या गुन्ह्यासंदर्भात काही बॅंक अधिकाऱ्यांची चौकशी पुढील काळात केली जाऊ शकते. 

कुलकर्णी दांपत्य आणि त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम 420 नुसार ( फसवणूक करणे), महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी कुलकर्णी दांपत्याने प्रयत्न केले होते. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासंदर्भात कुलकर्णी यांना उच्च न्यायालयाने मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कुलकर्णी दांपत्यास दिल्ली येथे अटक करून शनिवारी संध्याकाळी उशिरा न्यायालयात हजर केले. 

तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे आणि विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी कुलकर्णी यांनी केलेल्या गुन्ह्याची माहिती न्यायालयात देत त्यांना 10 दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. ""आरोपीने नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हा केला आहे. खुनापेक्षा हा गंभीर गुन्हा असून, अनेक कुटुंबे आणि ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली. हा गुन्हा 2011 ते ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत घडला आहे. आरोपीने रिझर्व्ह बॅंकेची परवानगी न घेता ठेवीदारांकडून ठेवी जमा केल्या. सुमारे चार हजार 300 ठेवीदारांकडून त्यांनी ठेवी आणि गुंतवणुकीच्या स्वरूपात 325 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे आत्तापर्यंत निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या भागीदारीतील संस्थांनी गुंतवणूकदारांकडून सुमारे 1 हजार 153 कोटी रुपयांच्या ठेवी, कर्ज घेतल्याचा लेखा परीक्षण अहवालही प्राप्त झालेला आहे,'' अशी माहिती चव्हाण यांनी न्यायालयात दिली. 

"आरोपींनी सहा भागीदारी कंपन्या स्थापन केल्या असून, त्यांच्या माध्यमातून गुंतवणुकीची सुमारे 438 कोटी 22 लाख रुपये रक्कम त्यांनी स्वत:च्या बॅंक खात्यावर जमा केली. या रकमेतून त्यांनी जमीन खरेदी केली. आरोपींनी परस्परांच्या बॅंक खात्यातून कोट्यवधी रुपयांचे हस्तांतर केले आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्या वेबसाइटवरील माहितीनुसार आरोपी आणि त्यांच्याशी संलग्न कंपन्यांवर वेगवेगळ्या बॅंकांचे सुमारे 2 हजार 892 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीने कोणत्या बॅंकांकडून कोणत्या कारणासाठी कर्ज घेतले, प्रकल्प पूर्ण नसतानाही पैसा कोठे वळविला, या गुन्ह्यात बॅंक अधिकाऱ्यांचा किती सहभाग आहे याचा तपास करायचा आहे. हेमंती कुलकर्णी यांचे बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या बाजीराव रोड शाखेत एकाच नावाने तीन "कस्टमर आयडेंटिफिकेशन फाइल' (सीआयएफ) असून, कायद्यानुसार एकापेक्षा जास्त सीआयएफ करता येत नाही, हे तीन कोड एकाच व्यक्तीला का देण्यात आले, यात बॅंक अधिकाऱ्यांचा काय संबंध आहे का, याचा शोध घ्यायचा आहे. भागीदारीतील कंपन्या त्यांनी कंपनी ऍक्‍टनुसार नोंदविलेल्या नाहीत, या कंपन्यांना ठेवी घेण्याची परवानगी नसल्याचे रजिस्टर ऑफ कंपनीच्या कार्यालयातून कळविण्यात आले असून, याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. कंपन्यांचे पुणे, मुंबईत एकूण चौदा गृहप्रकल्प असून, त्यांची किंमत किती, त्याची कागदपत्रे कोठे आहेत याचा शोध घ्यायचा आहे. आरोपींनी या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे लपविली असून, ती जप्त करायची आहेत. ठेवींचे रजिस्टर, कॅशबुक आदी जप्त करायचे आहे. कंपनीमार्फत झालेल्या जमीन खरेदीत काही आरोपींच्या नातेवाइकांचा समावेश असून, त्यासंदर्भात चौकशी करायची आहे. लेखा परीक्षकांकडेही चौकशी करायची आहे, अशी माहिती चव्हाण यांनी न्यायालयास दिली. 
कुलकर्णी दांपत्यातर्फे ऍड. श्रीकांत शिवदे यांनी बाजू मांडली. ठेवीदारांचे पैसे देण्याची कुलकर्णी यांची तयारी आहे, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू होते, असे नमूद करीत शिवदे यांनी पोलिस कोठडीला विरोध केला नाही. आरोपी तपासाला सहकार्य करण्यास तयार असून, त्यांना कमी दिवस पोलिस कोठडी द्यावी, आरोपींना नियमित वैद्यकीय उपचार मिळावेत, वकिलांना दररोज आरोपींची भेट घेण्यास परवानगी मिळावी, अशा मागण्या शिवदे यांनी केल्या होत्या. न्यायालयाने कुलकर्णी दांपत्यांना वैद्यकीय मदत दिली जावी, त्याचप्रमाणे दररोज सायंकाळी सात ते साडेसात या वेळेत आरोपींची भेट घेण्यास परवानगी दिली. पुणे शहरात महिला आरोपींना ठेवण्यासाठी केवळ फरासखाना पोलिस ठाण्यातच कोठडी असल्याच्या मुद्याकडे शिवदे यांनी लक्ष वेधले. शहरातील इतर पोलिस ठाण्यांतील महिला आरोपींना एकाच ठिकाणी ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी न्यायालयात नमूद केले. 

....असे रंगले "डीएसके'चे अटक नाट्य! 
या प्रकरणाच्या पहिल्याच दिवसापासून पोलिस डीएसकेंच्या मागावर होते. शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण शेवटच्या टप्प्यावर येऊ लागले. पुणे पोलिसाच्या आर्थिक व गुन्हे शाखेची चार पथके तयारीत होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डीएसके दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जातील, अशी शक्‍यता खरी ठरत गेली. डीएसके मुंबईतून विमानतळाकडे गेले. त्यांचे पारपत्र आधीच जप्त केल्याने ते अन्य देशांत जाण्याचा प्रश्‍नच नव्हता. तेव्हा मुंबई विमानतळाहून ते दिल्लीला गेल्याचे त्यांच्या मागावरील पोलिसांनी खबर दिली. ते दिल्लीत पोचले. पुढे "वसंतकुंज' परिसरातील "डीएमआर सिएट' या हॉटेलमध्ये थांबले. हीदेखील माहिती पथकास मिळत होती. शनिवारी पहाटे पोलिस हॉटेलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती यांना ताब्यात घेतल्यानंतर डीएसकेंच्या "अटक नाट्या'वर पडदा पडला आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com