नागपूरमध्ये जाऊन 'संघ समाप्ती संमेलन' घेऊ: जिग्नेश मेवानी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

तुम्ही जय भीम म्हणत असाल किंवा नव बुद्धाय, तुम्ही लाल सलाम म्हणत असाल किंवा तुमच्याकडे कुठलाही रंग नसेल, राम-रहीम-बुद्ध-कबीर यांना मानत असाल किंवा माझ्यासारखे नास्तिक असाल... या प्रत्येकाने आपल्यातील मतभेद विसरून किंवा ते कायम ठेवून एकत्र यायला हवे.

पुणे : "मला पूर्ण विश्‍वास आहे... आपण एका वेळेसाठी एकत्र आलो तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरी पाठवू शकतो. 2019 मध्ये यांच्या जागा दोन आकड्यांवर आणू शकतो आणि देशाचे संविधान वाचवू शकतो,'' असे गुजरातमधील राष्ट्रीय दलित अधिकार मंचाचा युवा नेता जिग्नेश मेवानी सांगत होता. कितना झूठ, कितनी जुमलेबाजी... इतना बोअरिंग और पकाऊ आदमी हमने कभी देखां नहीं, असेही तो म्हणाला. 

भीमा कोरेगाव लढ्याला 200 वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने आयोजित एल्गार परिषदेचे उद्‌घाटन शहीद रोहित येमुला यांच्या आई राधिका येमुला यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जिग्नेश बोलत होता. त्याला ऐकण्यासाठी शनिवारवाड्यासमोरील पटांगण गर्दीने तुडुंब भरले होते. तुम्हाला मोदींच्या भाषणाचा कंटाळा आला आहे का, असा समोरील गर्दीला प्रश्‍न विचारत, मोदींच्या भाषणाची नक्कल करत "हे खोटारडे पंतप्रधान आहेत. आता कोणी गुजरातला "व्हायब्रंट' म्हणण्याचे धैर्य करणार नाही, अशी टीका जिग्नेशने केली. 

जिग्नेश म्हणाला, "तुम्ही जय भीम म्हणत असाल किंवा नव बुद्धाय, तुम्ही लाल सलाम म्हणत असाल किंवा तुमच्याकडे कुठलाही रंग नसेल, राम-रहीम-बुद्ध-कबीर यांना मानत असाल किंवा माझ्यासारखे नास्तिक असाल... या प्रत्येकाने आपल्यातील मतभेद विसरून किंवा ते कायम ठेवून एकत्र यायला हवे. कारण घटना बदलण्याचे "त्यांचे' स्वप्न आहे. ते आपण हाणून पाडू. त्यांनी घटना बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करावा आम्ही तिला वाचवण्याचा करू.'' 

मोदी आणि शहांना गुजरातमधील दीडशे जागांची घमेंड होती. ती घमेंड आम्ही 99वर आणून ठेवली आहे. आता कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये निवडणुका येत आहेत. यात कोण निवडून येईल, यात रस नाही; पण भाजप हरले पाहिजे, यात रस आहे. कारण हे हिटलर, मुसोलिनी तत्त्वज्ञानावर विश्‍वास ठेवणारे आहेत. आता 2019 मध्ये महासंग्राम होईल. इस में मोदींजीको मजा चखाऐंगे. त्याआधीपासूनच नागपूरमध्ये जाऊन "संघ समाप्ती संमेलन'सुद्धा आम्ही घेऊ, असेही त्याने सांगितले. दरम्यान, खालिद, सिंग, दोंथा या तरुणांनीही भाजप सरकारवर टीका करत एकत्रित "नव पेशवाराज' संपवू, असे आवाहन केले. 

या वेळी भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, "जेएनयू'मधील भगतसिंग-आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे उमर खालिद, आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे प्रशांत दोंथा, "भीम आर्मी'चे विनय रतन सिंग, सर्वहारा जन आंदोलनाच्या उल्का महाजन, आदिवासी महिला नेत्या सोनी सोरी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना अब्दुल हमीद अजहरी उपस्थित होते. 

...ते तुम्ही भोगू नये 
"मी जास्त शिकलेली नाही; पण तुम्ही शिकलेला आहात. मी घरातून बाहेर पडलेय अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. तुम्हीही आता बाहेर पडा. पुरुषांनीच नव्हे महिलांनीसुद्धा... आरएसएस आणि बीजेपीकडून लादल्या जाणाऱ्या "नव्या पेशवाई'विरोधात आपण एकत्रित लढू आणि यात जिंकूही...'' असे आवाहन राधिका येमुला यांनी केले. नव्या पेशवाई पद्धतीतूनच माझ्या मुलाची हत्या झाली आहे. मी जे भोगले ते तुम्ही भोगू नये, असे वाटते,'' असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Marathi news Pune news Jignesh Mevani criticize RSS and Narendra Modi