सामाजिक एकात्मतेसाठी शिवचरित्र समजून घ्यावे 

सामाजिक एकात्मतेसाठी शिवचरित्र समजून घ्यावे 

पुणे : ''धर्मवाद-प्रांतवाद, जातीयवाद निघून जावा आणि समाजात एकात्मता यावी, यासाठीच छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र समजून घेतले पाहिजे. ते केवळ मराठ्यांचे किंवा एका धर्माचे नव्हते. युद्धकौशल्यात जागतिक स्तरावरची व्यवस्था निर्माण करणारे ते एकमेव राजे होते,'' असे मत 'सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. 

वसंत चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक पत्रे व युद्धनौकांच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर, नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप रावत, इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे, भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्री. मा. भावे उपस्थित होते. फाउंडेशनतर्फे शस्त्रास्त्र अभ्यासक गिरीश जाधव व इतिहास संशोधक घनश्‍याम ढाणे यांनी संग्रहित केलेल्या ऐतिहासिक शस्त्रास्त्रे व आरमारविषयक प्रतिकृतींचे हे प्रदर्शन उद्यापर्यंत (ता. 18) बालगंधर्व कलादालन येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. 

पवार म्हणाले, ''शिवाजी महाराजांसाठी शेकडो, हजारो मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. पण, ते मराठ्यांचे होते, हा मूर्खपणा जोपासला जातो, हे दुर्दैव आहे. त्यांच्या चरित्रातून खूप काही शिकता येईल. दूरदृष्टीच्या महाराजांनी आरमार उभे केले. यशस्वी राजकारणही केले. वस्तुत: इतिहासातून प्रेरणा घ्यायची असते, तो समजून घ्यायचा असतो; पण भारतीयांमध्ये इतिहास जतन करणे आणि समजून घेण्याबद्दल अनास्था आहे. महाराजांनी प्रचंड संघर्ष केला, या अनुषंगाने इतिहास शिकला पाहिजे. मात्र, इतिहास हा मतांसाठी नाही. राजकारणी व्यक्तींनीदेखील मतांसाठी समाजात जातीयवाद वाढवू नये.'' 

रावत म्हणाले, ''महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास हिंदुस्थानशी निगडित आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची ओळख भावी पिढीला करून देणे हे आपले कर्तव्य आहे.'' 

बलकवडे म्हणाले, ''21 व्या शतकातील लोकशाहीला मार्गदर्शक ठरावी, अशी राज्यव्यवस्था शिवरायांनी निर्माण केली. ते श्रद्धावान होते, मात्र अंधश्रद्धेच्या विरुद्ध होते. त्यांचा लढा मानवतेसाठी होता.'' 

इंदुलकर म्हणाल्या, ''नव्या पिढीचे इतिहासाचे वाचन कमी झाले आहे. त्यांना शिवाजी महाराजांचे आरमार, शस्त्रास्त्रांबद्दल माहिती व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरविले आहे. भविष्यात फाउंडेशनतर्फे ऐतिहासिक घटना व त्यांचे महत्त्व, शिवाजी महाराजांचे कृषीविषयक धोरण, अर्थनीती, तसेच राणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या व्यक्तिमत्त्वांविषयीच्या क्‍लिप्स तयार करून सोशल मीडियाद्वारे पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याचे कार्य हाती घेणार आहोत.'' फाउंडेशनच्या उपाध्यक्ष निवेदिता साबू यांनी आभार व्यक्त केले. 

प्रदर्शनात हे पाहा 
गुराब, गलबत युद्धनौका व पाल या लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती घनश्‍याम ढाणे यांनी बनविल्या आहेत. शिवकालीन शस्त्रास्त्रांमध्ये ढाल-तलवार, कट्यार, कुकरी, भाले, मुल्हेरी मूठ, दांडपट्टा, संगीन, अंकुश, कुऱ्हाड, गुप्ती, पेशकबज, खंजराली, जंबिया यांसारखी विविध शस्त्रे संग्राहक गिरीश जाधव यांनी संग्रहित केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com