पुणे-सोलापूर महामार्ग समस्यांच्या विळख्यात

pune-solapur highway
pune-solapur highway

मांजरी : थेट महामार्गावर येऊन विक्री व्यवसाय करणाऱ्या हातगाड्या, रात्रंदिवस पार्क होत असलेली अवजड वाहने, गेली अनेक महिन्यांपासून मार्गावरून वाहत असलेले ड्रेनेज व धोकादायक कचरा कुंड्या, अशी परिस्थिती सध्या लक्ष्मी काॅलनी ते शेवाळेवाडी या परिसरातील सोलापूर महामार्गावर पाहवयास मिळत आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे की अडथळ्यांचे आगार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

हडपसर ते कवडीपाट या सुमारे पाच किलोमीटर सोलापूर महामार्गाचे तीन वर्षापूर्वी रूंदीकरण झाले आहे. मात्र, लक्ष्मी कॉलनी ते शेवाळेवाडी या परिसरात महामार्गाच्या दुतर्फा थेट रस्त्यावर फळे, भाजीपाला व इतर चिजवस्तू विकणारया हातगाड्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच खासगी अवजड वाहनांनी अनाधीकृत पार्किंगचे अड्डे निर्माण केले आहेत. त्यामध्ये वाळू व रेडीमिक्स वाहतूक करणाऱ्या वाहनांचे प्रमाण मोठे आहे. याशिवाय महामार्गावर येथील पाच- सहा सोसायट्यांचे ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत आहे. त्यामुळे महामार्गावर चिखलही निर्माण झाला आहे. याच ठिकाणी मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतने थेट रस्त्यावरच कचरा कुंड्या मांडल्या आहेत.

त्यामुळे स्थानिक नागरीक व प्रवासी वाहनांना या ठिकाणाहून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ड्रेनेजचे पाणी व कचरयामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अनेक व्यवसायिकांनी फूटपाथवरच आपला व्यवसाय थाटला आहे. या सर्वांचा परिणाम येथील वाहतूकीवर झाला असून अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी येथील कचरा कुंड्या व ड्रेनेजचे पाणी वाहन चालकाच्या लक्षात येत नसल्याने वारंवार अपघात सदृष्य परिस्थिती निर्माण होत असते.

याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा हायवे अॅथाॅरिटी, ग्रामपंचायत तसेच खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार योगेश टिळेकर यांच्यकडे तक्रार केली आहे. मात्र त्याबाबत गांभिर्याने घेतले जात नसल्याचे दिसते. खासदार आढळराव यांनी मतदार संघ दौरयात या प्रश्नांची पाहणी करून संबधीत विभागाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलिसांचाही येथील अतिक्रमणाकडे काना डोळा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

"हडपसर येथील सोलापूर महामार्गाच्या प्रश्नाबाबत हायवे अॅथाॅरिटी व ग्रामपंचायतला सूचना दिलेल्या आहेत. त्याबाबत कार्यवाहीही करण्यास सांगितले आहे."
- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार, शिरूर लोकसभा

"सोलापूर महामार्गावर झालेली अतिक्रमणे, अनाधीकृत पार्किंग, वाहनारे ड्रेनेज व कचरा कुंड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. लवकरच हा प्रश्न सुटेल."
- योगेश टिळेकर, आमदार, हडपसर विधानसभा 

"येथील ड्रेनेज व कचरा कुंड्या बाबत ग्रामपंचायतला पत्र दिले आहे. त्यांनी दखल न घेतल्यास कारवाई करण्यात येईल."
- ए. एल. गिरमे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com