मुलांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी वैभवीची निवड

Vaibhavi Kolhe
Vaibhavi Kolhe

मांजरी खुर्द : शाळाबाह्य व गैरहजर मुलांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कु. वैभवी अंजीरराव कोल्हे या सातवीच्या विद्यार्थिनीची दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी निवड झाली आहे. मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील जिल्हापरिषद शाळेत ती शिक्षण घेत आहे. बंगळूर (कर्नाटक) येथे दीड महिन्यापूर्वी अशोका युथ व्हेंचरने आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेमध्ये तीने प्रतिनिधीत्व केले होते.

"सेव्ह द चिल्ड्रन'' या दिल्लीस्थित संस्थेच्या माध्यमातून कु. वैभवी मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. त्यासाठी आपल्या समविचारी मित्र-मैत्रीणींना बरोबर घेवून परिसरातील अशा पालकांना व मुलांना भेटून त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी ती धडपड करीत आहे. गाव-परिसरातील शालाबाह्य तसेच गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी होत असलेल्या तिच्या धडपडीचे कौतुक होत आहे.

या कामासाठी तीने "शिक्षण प्रेरणा गटा'' ची स्थापना केली आहे. या गटाच्या माध्यमातून ती शाळेत न येणाऱ्या मुलांच्या घरी जाऊन व त्यांचे प्रबोधन करून त्यांना शाळेत जाण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम करीत आहे. बांधकामगार, शेतमजूर, वीटभट्टीवरील मजूर, ऊस तोड मजूर या वेळोवेळी स्थलांतरीत होत असलेल्या पालकांशी व त्यांच्या मुलांशी संवाद साधून त्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन तिच्याकडून केले जात आहे. मुलांना आपल्याच भाषेत समजावून सांगून व त्यांच्यासमोर भविष्यातील परिस्थिती मांडून शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचे काम ती करीत आहे. 

अप्रगत विद्यर्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना अभ्यास करण्याची पध्दत सांगून त्यातील गोडी वाढविण्याचे कामही ती करीत आहे. आपल्या समजाविण्याच्या खुबिचा उपयोग करून अनेक विद्यार्थ्यांमध्ये तीने चांगला बदल घडविला आहे. 

वैभवीच्या शिक्षण प्रेरणा गटाच्या कामाची दखल घेऊन ""सेव्ह द चिल्ड्रेन'' संस्थेने बंगळूर येथील अशोका युथ व्हेन्चरमधील सहभागासाठी तीची निवड केली होती. राज्यातून त्यासाठी केवळ पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातही राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान तिला मिळाला होता. या परिषदेसाठी देशभरातून सव्वीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

केलेल्या शैक्षणिक कार्याचे तीने या परिषदेमध्ये उत्कृष्ठ पध्दतीने सादरीकरण केले. तीच्या या कार्याची व सादरीकरणाची दखल घेवून सहभागी सव्वीस पैकी पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये तीची निवड केली आहे. पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी आता तिची निवड झाली आहे. येथे तीचे सादरीकरण चांगले झाल्यास स्वीत्झरलँड येथील जागतिक परिषदेतही प्रतिनिधीत्व करण्याची संधी तिला मिळणार आहे. 

तिच्या कामाविषयी जाणून घेवून तसेच त्याच्यातील वेगळेपणाची दखल घेवून पंधरा दिवसांपूर्वी आकाशवाणी केंद्राने तिची मुलाखत प्रसारीत केली होती. 

वैभवीचे वडील ड्रायव्हिंगचे काम करीत आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्येही ती करीत असलेल्या कामाचे परिसरात मोठे कौतुक होत आहे. मुख्याध्यापक राजेंद्र ओव्हाळ, शाळेतील शिक्षक नेहा बनकर, सुनंदा यादव, लिना डिक्रुज, वैशाली जाधव, दीपक गायकवाड, निलोफर शेख, प्रतिभा लोहार व सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे समन्वयक शीतल तागडे हे तिला मार्गदर्शन करीत आहेत.

"परिसरातील काही मुलांना व त्यांच्या पालकांना आजूनही शाळेचे महत्व कळत नाही, हे दुर्दैव आहे. त्यांना समजावून सांगताना हे जाणवते. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्थलांतरीत मजूरांच्या कुटुंबात शिक्षणाचे महत्व पोहचविण्याची गरज आहे. अभ्यासाच्या पध्दती मुलांना सांगितल्यास त्यांच्यात चांगली प्रगती होत असल्याचे दिसते. या कामाने मला मोठा आनंद मिळत आहे. यापुढेही हे काम नेटाने करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यासाठी संस्था व शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन मिळत आहे.'' 
- कु. वैभवी कोल्हे, विद्यार्थिनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com