शिवरायांच्या जयघोषाने शिवजन्मभूमी दुमदुमली

Shivneri
Shivneri

जुन्नर (पुणेे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो शिवप्रेमींनी केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज की जय !' या जयघोषाने किल्ले शिवनेरीचा परिसर आज दुमदुमून गेला.  

शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीहून शेकडो शिवज्योती मार्गस्थ झाल्या. 
पंचालींग चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळचा परिसर ढोल ताशांच्या गजराने तसेच भगव्या झेंड्यानी शिवमय झाला होता. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवज्योत व शिवरायांच्या प्रतिमेची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूका काढण्यात येत होत्या.

शिवनेरीवर शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, विश्वास देवकाते, आमदार शरद सोनवणे, विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, अतुल बेनके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्माचा सोहळा पार पडला. पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी शिवजन्मस्थानी पाळणा म्हटला. सर्वांना सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. किल्ल्यावर करण्यात आलेली फुलांची आकर्षक सजावट, मैदानी खेळ, मल्लखांब प्रात्यक्षिकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. असंख्य शिवभक्त हातात भगवा झेंडा फडकावत 'जय जिजाऊ जय शिवराय', 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा देत गडावर येत होते.

"छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने महाराष्ट्राचा राज्य कारभार सुरु असून शालेय शिक्षण व्यवस्थेत छत्रपतींचा इतिहास व शौर्यकथा याबाबतची माहिती आहे परंतु दुष्काळ निवारण व पर्यावरण संरक्षणाचीही व्यवस्था त्याकाळी होती या माहितींचा शालेय अभ्यासक्रमात समावेश नव्हता. त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक होते, हे नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे" असे शालेय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमात सांगितले.

किल्ले लढाईचा इतिहास थ्रीडी मॅपिंगच्या व अॅनिमेशनच्या आधारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत सांगितले. याप्रसंगी आमदार विनायक मेटे, राजेंद्र कुंजीर, कैलास वडघुले, राजेंद्र बुट्टे, रविंद्र काजळे, सुनिल ढोबळे, नंदकुमार तांबोळी सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच शिवरायांच्या वेशभूषेतील बालचमू उपस्थित होते. याप्रसंगी ऋषिकेश काळे आणि सहकाऱ्यांनी पोवाड्याचे गायन केले. शिवनेरीवरील जन्म सोहळ्यानंतर  मुख्यमंत्री सांस्कृतिक व मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकास उपस्थित राहून शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतात परंतु यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेस शुभेच्छा न देताच निघून गेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com