पुण्यातील कैद्यांनी अनुभवले नादब्रम्ह

पुण्यातील कैद्यांनी अनुभवले नादब्रम्ह

पुणे : शब्दब्रम्ह व स्वरब्रम्ह यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या नादब्रम्हाची प्रचिती शनिवारी येरवडा कारागृहातील दोन हजार कैद्यांनी अनुभवली. ड्रम, घुंगरू,डफ या वाद्यांसोबतच पातेली, बादली, पाण्याचे कॅन, बाटल्या या वस्तूंमधूनसुद्धा शिवमणीनी काढलेल्या ध्वनीमुळे कैदी मंत्रमुग्ध झाले होते.

महाराष्ट्र कारागृह प्रशासन,भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या प्रेरणापथ या उपक्रम अंतर्गत जगप्रसिद्ध ड्रमवादक व तालयोगी शिवमणी यांनी वादन कलेची अनुभुती कैद्यांनी घेतली. यावेळी कारागृह उपमहानिरिक्षक विठ्ठल जाधव, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यु.टी.पवार,उपअधीक्षक चंद्रमणी इंदूरकर, दक्षता अधिकारी राजेंद्र जोशी, तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर खरात, अनिल वांडेकर, मंगेश जगताप उपस्थित होते. 

कैद्यांबरोबर संवाद साधताना शिवमणी म्हणाले, ’’ कारागृहातील कैद्यांसमोरील सादरीकरणाने त्यांच्यामध्ये संगीताच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे भाग्य लाभले. या ऊर्जेच्या अनुभूतीने हे कैदी भविष्यात पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता सकारात्मक काम करतील असा विश्वास आहे.’’ 

कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मिलिंद भोई यांनी कैद्यांना संगीतकार ए. आर. रहेमान यांना ऐकण्याची इच्छा आहे अशी विनंती शिवमणी यांना केली. यावेळी शिवमणी यांनी ते त्वरीत मान्य करून रहेमान यांना येरवडा कारागृहात नक्की घेऊन येईन असे आश्वासन देताच बंदीजणांनी जल्लोष केला.

विद्या जाधव यांनी काढलेले तैलचित्र शिवमणी यांना भेट देण्यात आले. कार्यक्रमासाठी 
नितीन क्षीरसागर, तरुण गागडे, बबलू रमजानी,रवी काटकर,सचिन नाईक,विकास काळे,ॲड.प्रताप परदेशी, राजकुमार आगरवाल,जगन्नाथ जाधव,अजय बल्लाळ,राजेश जाधव,मनीष साबडे, सदाशिव कुंदेन,दिपक वनारसे,विशाल नलावडे,महेंद्र आगरवाल,शमिका होजगे यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. 

शिवमणी यांनी ड्रमवर विविध राज्यातील संगिताचा प्रवास घडविला. यामध्ये त्यांनी ड्रमवर पंजाबचा भागडा, महाराष्ट्रातील ढोलपथक, गुजरातच्या गरभ्याचा ठेका धरला होता. त्यावेळी कैद्यांनी जल्लोष केला.

शिवमणी यांनी पाण्याच्या कॅनवर ताल धरत ते कैद्यांनाही वाजविण्यास सांगून त्यांच्याबरोबर जुगलबंदी केली. शिवमणी यांनी कैद्यांमधून एका ज्येष्ठ कैद्याची निवड करून त्यांना रंगमंचावर आणून त्यांच्याबरोबर ड्रमवर जुगलबंदी केली. याला कैद्यांसह सर्व उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडात त्यांना दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com