'स्मार्ट सिटी'साठी विकासात सातत्य महत्वाचे : कुणाल कुमार

kunal kumar
kunal kumar

लोणी काळभोर : पुणे शहराला देशातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट शहर म्हणून उदयास येण्यासाठी सर्वसामान्यांचे गुणवत्तापूर्ण जीवन, जागतिक अर्थव्यवस्था व विकासामध्ये सातत्य ठेवणे हे तीन मुद्दे महत्वाचे आहेत, असे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व्यक्त केला.

पुणे येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे आयोजित जागतिक पातळीवरील दोन दिवसीय उद्योजकता संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या संमेलनासाठी केरळचे प्रिन्सिपल अकांउंटन्ट जनरल डॉ. अमर पटनाईक, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सहसचिव डॉ. श्रवण कुमार, एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, मुख्यमंत्र्याच्या सल्लागार श्‍वेता शालिनी, एमएसआरएलएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला, आयसीटीच्या संचालिका प्रा. सुनिता कराड, इंट्राप्रेनियर कॅफेचे संस्थापक डॉ. निखिल अग्रवाल, डॉ. रूची अग्रवाल व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनिल राय उपस्थित होते.  

कुणाल कुमार म्हणाले, "स्मार्ट सिटीमध्ये लोकमाहिती व्यवस्था, तक्रार निवारण व्यवस्था चांगली असते, सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात. येथे नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात ठेवले जाते. कचऱ्यापासून उर्जा व इंधन बनविले जाते. वीज व  पाणी पुरवठ्यासाठी स्मार्ट मीटर्स असते. विजेचा वापर कार्यक्षम असतो. वाहतूक नियोजन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाते. त्यामुळे स्मार्ट सिटीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. भविष्यकाळ हा तंत्रज्ञानाने युक्त असेल. अशा वेळेस युवा उद्योजकांनी तंत्रज्ञानाची कास धरावी. सामाजिक समस्या जाणून नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून समाज उन्नतीचे नव तंत्र विकसित करावे."

डॉ. मंगेश कराड म्हणाले, "नवनिर्मितीसाठी उद्योजक महत्वाची भूमिका पार पाडतात. या विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी झेप घेऊन विद्यार्थ्यांचे वेगळे व्यक्तिमत्व निर्माण करीत आहे. नवउद्योजकांनी सामाजिक व राजकीय आव्हाने स्वीकारून कार्याची सुरवात करावी. आम्हाला भारतीय मायक्रोसॉफ्ट व गुगलसारख्या तंत्रज्ञानाची निर्मिती करावयाची आहे. त्याचप्रमाणे सुंदर पिचाई व सत्या नडेल यांसारख्या बुद्धीमत्तेची गरज मोठ्या प्रमाणात आहे. त्या दिशेने शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण कार्य करावयाचे आहे. त्यासाठी उद्योजक व शिक्षण संस्थामध्ये भागीदारी होणे गरजेचे आहे." 

संमेलनाचे प्रास्ताविक डॉ. निखील अग्रवाल यांनी केले. अर्चना साह व श्रृती पंडित यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे स्वागत व आभार डॉ. सुनील राय यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com