girl harassment
girl harassment

पुणे: कॉपीच्या संशयावरून मुलींची विवस्त्र तपासणी 

लोणी काळभोर : बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी केल्याच्या संशयावरून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील "एमआयटी'च्या कनिष्ठ महाविद्यालयात 50 हून अधिक मुलींचे कपडे उतरवून तपासणी करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. 28) घडला. यातील वीस मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी "एमआयटी'च्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र बावसस्कर व संस्थेच्या तीन महिला कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, बुधवारी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या पेपरदरम्यान हा प्रकार घडला. "एमआयटी'च्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बावसस्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र पालक व विद्यार्थिनींनी केलेला आरोप फेटाळून लावला. 
बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास विद्यार्थी "वाणिज्य संघटन व व्यवस्थापन' या विषयाचा पेपर देण्यासाठी "एमआयटी'च्या केंद्रात आले. "एमआयटी'च्या तीन महिला कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींना एका खोलीत घेऊन त्यांच्याकडे कॉपी आहे का, याची तपासणी करण्यास सुरवात केली. काहींना केवळ चाचपून, तर काहींना थेट कपडे उतरविण्यास सांगण्यास सुरवात केली. कॉपी तपासणीसाठी कपडे उतरविण्यास मुलींनी नकार देताच, तपासणी करणाऱ्या तीन महिला कर्मचाऱ्यांनी कपडे उतरवून तपासणी करू न दिल्यास एकालाही परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशी धमकी देण्यास सुरवात केली. या धमकीमुळे पन्नासहून अधिक विद्यार्थिनींनी संबंधित तीन महिला कर्मचाऱ्यांना हवी तशी तपासणी करू दिली. मात्र, परीक्षा संपल्यानंतर काही मुलींनी आपल्या पालकांना ही माहिती दिली. त्यावर वीसहून अधिक पालकांनी शनिवारी (ता. 3) सकाळी अकराच्या सुमारास एकत्र येऊन, पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

याबाबत एक पालक म्हणाले, ""कॉपी होऊ नये, यासाठी विद्यार्थिनींची तपासणी करण्यास कोणाचीही हरकत नव्हती. मात्र, आत्तापर्यंत बारावीच्या झालेल्या चारही विषयांच्या परीक्षेदरम्यान कॉपी तपासणीच्या नावाखाली मुलींना विवस्त्र करून तपासणी करण्यात आल्याची माहिती मुलींनी पालकांना दिली आहे. कॉपी तपासणीच्या नावाखाली मुलींना विवस्त्र करणे, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. काही मुली परीक्षेला जाताना रडत असल्याचे पाहून, पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर वरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत मुली व पालकांच्या वतीने लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर यांच्या समवेत लोणी काळभोर पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची चौकशी करून, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.'' 

"कपडे उतरविण्याचा आरोप चुकीचा' 
"एमआयटी'च्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र बावसस्कर म्हणाले, ""कॉपीच्या संशयावरून पन्नासहून अधिक मुलींचे कपडे उतरवून तपासणी करण्यात आली, हा आरोप चुकीचा आहे. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी होऊ नये, यासाठी सर्वच विद्यार्थ्यांची तपासणी करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना दिली होती. या सूचनांच्या आधारे कर्मचाऱ्यांनी केवळ तपासणी केली. एकाही विद्यार्थिनीला कपडे काढायला लावण्यात आलेले नाहीत. एका विद्यार्थिनीकडे कॉपी सापडल्याने, आम्ही तिला समज दिली होती. त्याच विद्यार्थिनीच्या पालकाने काही पालकांना एकत्र करून हा आरोप आमच्यावर केला आहे. पोलिसांच्या चौकशीस आम्ही तयार आहोत.''

जिल्हा परिषदेकडून निषेध 
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या शनिवारी (ता. 3) झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कॉपीच्या संशयावरून बारावीच्या मुलींना तपासणीसाठी विवस्त्र करणे निषेधार्ह असल्याचा मुद्दा शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके यांनी उपस्थित केला. या घटनेचा जिल्हा परिषदेतर्फे निषेध करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली. त्यानंतर अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी याबाबत ठराव मांडण्याची सूचना बुचके यांना केली. त्यानुसार त्यांनी या घटनेच्या निषेधाचा ठराव मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याशिवाय याबाबत राज्य सरकारला पत्रव्यवहार करून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी या वेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com