पोलीस पाटलांनी गावोगावी सक्षम 'ग्राम संरक्षक दले' तैनात करा

श्रीकृष्ण नेवसे 
गुरुवार, 18 जानेवारी 2018

सासवड : जुने पोलीस पाटील मेहनती व कामसू आहेत. तर नव्याने भरती झालेले बहुतेक पोलीस पाटील उच्चशिक्षीत आहेत. त्यामुळे नव्या-जुन्यांचा मेळ घालून कायद्याचे प्राथमिक ज्ञान देत गावोगावी सक्षम ग्राम संरक्षक दले तैनात करुन सुरक्षेचे वातावरण तयार करण्यास पोलीस यंत्रणा लक्ष घालत आहे, असे प्रतिपादन सासवडचे उप विभागीय पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी येथे केले.  

सासवड : जुने पोलीस पाटील मेहनती व कामसू आहेत. तर नव्याने भरती झालेले बहुतेक पोलीस पाटील उच्चशिक्षीत आहेत. त्यामुळे नव्या-जुन्यांचा मेळ घालून कायद्याचे प्राथमिक ज्ञान देत गावोगावी सक्षम ग्राम संरक्षक दले तैनात करुन सुरक्षेचे वातावरण तयार करण्यास पोलीस यंत्रणा लक्ष घालत आहे, असे प्रतिपादन सासवडचे उप विभागीय पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी येथे केले.  

सासवड (ता. पुरंदर) येथील तालुका पंचायत समितीच्या संभाजीराजे सभागृहात आज 'पोलीस पाटील' दिनी तालुक्यातील पोलीस पाटलांचा मेळावा झाला. त्यावेळी जुन्या पोलीस पाटलांकडून नव्या पोलीस पाटलांचे राज्य संघटनेतर्फे स्वागत झाले. त्यात मुख्य मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते. कार्यक्रमास राज्य पोलीस पाटील संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब काळभोर, जिल्हाध्यक्ष रोहीदास शिंदे, महिला आघाडी अध्यक्ष तृप्ती मांडेकर, पुरंदर तालुका अध्यक्ष बाळासाहेब झेंडे, पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, राजेश माळेगावे, विजय कुंजीर, शंकर कुदळे, उमेश तळेकर, विनायक गायकवाड, कैलास जगताप, राजेंद्र रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

जाधव म्हणाले, जिल्हा पोलीस अधिक्षक सुवेक्ष हक यांनीच ग्राम संरक्षक दले नव्या ताकदीने कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस पाटलांची मानधन वाढ, प्रवास भत्ता व इतर सुविधांबाबत लवकरच कार्यवाही होईल. मात्र पोलीस पाटलांनी हे लक्षात घ्यावे की, पोलीस पाटील हे पद मिरवायचे नाही. तर ते एक सामाजिक कार्याचे पद असून कामाची मोठी संधी आहे. गावे आदर्श करण्यात सरपंच व इतर कारभारी मंडळींइतकीच जबाबदारी पोलीस पाटलांनी स्विकारावी. 

दादासाहेब काळभोर म्हणाले., गावात कोणत्याही बाबीचा वणवा पेटण्याआधी पोलीस पाटलाला कळलेच पाहिजे. इतकी सतर्कता ठेवावी. त्यातून पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होईल. गुन्हेगारांशी तुम्ही लढू नका, मात्र त्यांच्या हालचालीची माहिती वेळेत पोलीस ठाण्यात द्या. त्यातून गुन्हेगारी रोखली जाईल. तृप्ती मांडेकर यांनी महिला पोलीस पाटील वाढल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक विनायक गायकवाड यांनी केले. स्वागत विजय कुंजीर, बाळासाहेब झेंडे, शंकर कुदळे आदींनी केले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र देवकर यांनी केले.

 

Web Title: Marathi news pune news village security