शिर्सुफळची नळपाणी योजना दोन वर्षापासुन रखडली

water
water

शिर्सुफळ : शिर्सुफळ (ता.बारामती)  गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यासाठी राबविण्यात आलेली नळ पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षापासुन रखडला आहे. याबाबत अनेक भागात पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होऊनही अवैध वाळू उपशामुळे पाईपलाईनचे होत असलेल्या नुकसानीमुळे योजना कार्यान्वित करण्यात अडचण येत आहे. यामुळे तब्बल पावणे दोन कोट रुपये खर्चुनही शिर्सुफळकर पाण्यापासून वंचितच आहे.याबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बारामती तालुक्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या शिर्सुफळ गावचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्वी दत्तवाडी येथे असलेल्या पाणी पुरवठा विहिरीवरुन करण्यात येत होता.परंतू दत्तवाडी येथील विहिर उन्हाळ्यात  कोरडी पडते असे.यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या  पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत होता.या पार्श्वभूमीवर येथील कायम पाण्याचा स्त्रोत असलेल्या ब्रिटीश कालीन शिर्सुफळ तलावालगत विहिर खोदुन तेथुन गावाला नळ पाणी पुरवठा योजना राबविण्याची मागणी करण्यात आली. त्यानुरुप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत वर्धित वेग योजना राबविण्यात आली. यासाठी सन 2013-14 मध्ये तब्बल 1 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. प्रत्येकक्षात जुलै 2016 मध्ये योजनेच्या कामाला सुरवात झाली. या माध्यमातून गाव व परिसरातील महादेव मळा, तांबे वस्ती, आटोळे वस्ती  येथे पाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या. तसेच तलाव परिसरात विहीर खोदुन तेथुन पाईप लाईटचा काम पूर्ण करण्यात आले.योजनेचे काम अंतिम टप्प्यात  असताना
शिर्सुफळकरांना नियमित पाणी मिळेल अशी आशा वाटत होती.

परंतू याच कालखंडात म्हणजे गेल्या वर्षभरापासुन शिर्सुफळ तलावातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरु झाला.आणि आर्थिक संबंधांच्या बळावर कोणालाही घाबरत नसलेल्या वाळू माफियांनी वाळू उपसा करताना दिडशे ते दोनशे पीव्हीसी पाईप तोडले. यामुळे योजनेचे काम अंतिम टप्प्यात असताना संबंधित पाईपांचा खर्चावरुन  पुन्हा खरडले आहे.यामुळे शिर्सुफळकरांना मात्र हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.

दरम्यान ग्रामपंचायत, पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती बारामती, तसेच गाव पाणी पुरवठा समिती, ठेकेदार यांनी झालेले नुकसान व संबंधित अवैध वाळू उपसा रोखण्याबाबत तालुका पोलिस स्टेशन तसेच महसूल विभागाकडे रितसर तक्रारी केल्या. पण वाळू माफियांच्या मुजोरी, दहशत व आर्थिक बळामुळे सदर तक्रारी कागदोपत्रीच राहिल्या आहेत.यामुळे याबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच लक्ष घालण्याची मागणी होत आहे. 

रितसर तक्रार देऊनही दुर्लक्ष..
याबाबत बोलताना पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष  हनुमंत मेरगळ म्हणाले,येथील पाणी पुरवठा योजनेचे काम काही तांत्रिक बाबी मागील वर्षीच पूर्ण झाले होते. त्यावेळेसच योजनेच्या कार्यान्वित करण्याची चाचणी घेण्यात येणार होती.परंतू त्यापूर्वी तलाव क्षेत्रातुन आलेल्या पाईपलाईनचे अवैध  वाळू  उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. याबाबत तालुका पोलीस  स्टेशनला रितसर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.मात्र कसली कार्यवाही झालेली नाही. तसेच झालेल्या नुकसानीमुळे योजना पुन्हा कार्यान्वित करणे अडचणीचे ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com