आमदार योगेश टिळेकर यांचा जनता दरबार

Yogesh-Tilekar
Yogesh-Tilekar

मांजरी (पुणे) : कुणाला नोकरी तर कुणाचा शाळा प्रवेश, कुणाला वीज, गॅसजोड तर कुणाला शौचालय, कुणी म्हणतयं अतिक्रमण हटवा तर कुणी मागतयं मंदिर-मस्जिदसाठी जागा, घरगुती भांडणापासून वस्ती व गावामधील रखडलेल्या प्राथमिक सुविधांपर्यंतचे असे शेकडो प्रश्न. मतदार संघातील सामान्य नागरिकांच्या समस्या निवारणासाठी आमदार योगेश टिळेकर यांनी पंधरा दिवसांपूर्वी सुरू केलेल्या जनता दरबारास मिळत असलेला हा प्रतिसाद. दरबारात येणाऱ्या नागरिकांची संख्या हळूहळू वाढू लागली असून त्यांच्या चेहऱ्यावर सध्यातरी समाधान दिसून येत आहे.

आमदार व भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी हडपसर विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी हडपसर येथे प्रत्येक रविवारी जनता दरबार सुरू केला आहे. या उपक्रमास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यामध्ये महिला व तरूणांची संख्या मोठी आहे. आमदार व समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकामध्ये थेट संवाद साधला जाऊन निराकरण होत असल्याने तो समाधानी दिसत आहे. 

मंडपाची सावली, नाश्ता-पाण्याची सोय, प्राधान्यक्रमानुसार विषयावर चर्चा, संबंधीत अधिकाऱ्यांना लागलीच फोन, डायरीत नोंद आणि पाठपुराव्याचे नियोजन अशा पध्दतीने दरबार होत आहे. त्यामुळे यापूर्वीच असा दरबार सुरू व्हायला पाहिजे होता, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत सुमारे तीनशेहून अधिक नागरिकांनी या दरबाराचा लाभ घेतला आहे.

मतदार संघातील विविध प्रभाग तसेच, मांजरी बुद्रुक, केशवनगर, मुंढवा, साडेसतरानळी भागातील मोठ्या प्रमाणातील नागरिकांनी या दरबारात तक्रारी व समस्यां मांडल्या. आरोग्य, बांधकाम, वीज, पाणीपुरवठा, रेशनिंग ,शालेय प्रवेश, रोजगार, अतिक्रमण अशा स्वरूपाच्या समस्यांचा सहभाग मोठा होता. 

आमदार टिळेकर म्हणाले, "हडपसर मतदार संघाचा सर्वागीण विकास घडवून आणण्याचा व  समस्यामुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्या संकल्पनेचा एक भाग म्हणून जनता दरबार भरविण्यात येत आहे. या जनता दरबारामुळे मतदार संघातील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचा तात्काळ निपटारा होत आहे. मतदार संघातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, त्यांचे जिव्हाळ्याचे परंतु मार्गी न लागलेले प्रश्न जागेवर सुटले पाहिजेत. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे ही संकल्पना या मतदार संघाचा प्रथम नागरिक म्हणून मी राबविली आहे. मतदार संघातील जनतेसाठी जनता दरबार ही संकल्पना सुरु केल्यानंतर संपूर्ण मतदार संघातील लोकांनी या जनता दरबारास उदंड प्रतिसाद दिला आहे. त्यांचे अनेक प्रश्न जागेवरच सोडवून देण्यात मला यश प्राप्त झाले आहे. असा जनता दरबार मतदार संघात यापूर्वी कधीही झाला नसल्याचे लोक आवर्जुन सांगतात. दर रविवारी सकाळी ९ ते दुपारी एक वाजेपर्यंत भरणाऱ्या या जनता दरबारात येऊन नागरिकांनी त्यांचे प्रश्न मांडावेत, समस्या सांगाव्यात. शक्य तितक्या लवकर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.''

बांधकाम व्यावसायिकही जनता दरबारात
सध्या पालिका हद्दीसह ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत बांधकामांवर प्रशासनाने हातोडा उगारलेला आहे. काही बांधकामे जमिनदोस्तही करण्यात आली आहेत. त्या प्रक्रियेत आपले नुकसान होऊ नये व काहीतरी मार्ग काढला जावा, या हेतुने अनेक छोट्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनीही दरबारात हजेरी लावली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com