निर्यात मूल्य घटूनही कांद्यात घसरण 

निर्यात मूल्य घटूनही कांद्यात घसरण 

पुणे - कांद्यावरील निर्यात मूल्य कमी झाल्यास शेतकऱ्यांना चांगले भाव मिळतील, अशी अपेक्षा शेतकरी, निर्यातदारांमधून व्यक्त होत होती, त्यानुसार निर्यात मूल्य कमी केले. मात्र, यंदा राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे, निर्यातही सुरू झाली आहे. मात्र, उत्पादन जास्त असल्याने दरामध्ये घसरण झाली आहे 

गरवी कांद्याचा हंगाम जोरात सुरू झाल्याने राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी सुमारे साडेतीनशे ट्रक कांद्याची आवक झाली. परिणामी कांद्यांच्या दरात सुरू झालेली घट या आठवड्यातही कायम राहिली. 

सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हटविल्यानंतर गेले काही दिवस कांद्याचे दर वाढले होते. अल्पावधीतच दरामध्ये वाढ होऊन ते स्थिरावले होते. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून गरवी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज पुणे विभागातील पाच जिल्ह्यांबरोबरच नगर आणि नाशिक येथूनही आवक झाली. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात कांद्याचे दर 130 ते 170 रुपये प्रति दहा किलो असे होते. आज हे दर प्रति दहा किलोस 100 ते 130 रुपयांपर्यंत खाली आल्याची माहिती अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. 

गुलटेकडी मार्केट यार्डबरोबरच चाकण, सोलापूर, नगर आणि श्रीगोंदा येथील बाजार आवारात कांद्याची मोठी आवक झाली. दक्षिण भारतातील कर्नाटकसह इतर राज्यांतील कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रातील कांद्याचे दर जास्त आहेत. त्यामुळे चढ्या दराने कांद्याची खरेदी खरेदीदार करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाढलेली आवक आणि घटलेली मागणी, यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले. 

पोमण म्हणाले, ""गेल्या पंधरा दिवसांत उत्तरेकडील दिल्ली, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती; मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून तेथील खरेदीदार खरेदी करत नसल्याचे चित्र आहे, त्यामुळेही दरात घसरण झाली आहे. तसेच, देशातील अनेक राज्यांमध्ये स्थानिक कांद्याचे पीक हाती येण्यास सुरवात झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला मागणी घटली आहे, परिणामी दरात घसरण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com