तनिष्कांना आज सुरक्षिततेचे धडे

तनिष्कांना आज सुरक्षिततेचे धडे

पुणे - शाळेतल्या मुलीवर त्याचं एकतर्फीच प्रेम होतं. त्यातूनच तो तिला फॉलो करायचा. शाळेत जाताना रिक्षामधून हटकून तिच्या शेजारीच बसायचा. प्रवासादरम्यान विकृत हेतूने तिला स्पर्श करायचा. ती घाबरली तर होतीच; पण काय करायचं, या विचारानं गोंधळलीही होती. पालकांकडं तक्रार करावी, तर शाळा बंद होण्याची आणि नाही केली, तर त्याचा उपद्रव वाढण्याची भीती! पण कुठून तरी तिला निर्भया पथकाची माहिती मिळाली. ओळख न सांगता पथकाला तिनं ही माहिती दिली अन्‌ त्या विकृताला त्यांनी रंगेहाथ पकडून चांगलाच धडा  शिकवला... 

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलिस दलाने स्थापन केलेल्या ‘निर्भया’ पथकाचा दरारा आता गावोगाव पसरू लागला आहे. पथकाने केलेल्या कारवायांमुळे सुरक्षिततेच्या बाबतीत मुली व महिला आश्‍वासित होऊ लागल्या आहेत. शाळा-महाविद्यालयांचा आवार, बसस्थानके, जत्रा, बाजार यासारख्या ठिकाणी मुली व महिलांची वर्दळ असते. अशा ठिकाणी रोडरोमिओही आढळतात. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत निर्भया पथकाची स्थापना केली आहे. 

स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल, पुरुष कर्मचारी व या टीमचे नेतृत्व करणारा एक अधिकारी अशी या पथकाची रचना आहे. साध्या गणवेशात म्हणजे अगदी सामान्य मुलीसारखे राहून या महिला कॉन्स्टेबल टवाळांना पकडतात. ते विद्यार्थी किंवा तरुण असतील, तर त्यांना पोलिस ठाण्यात आणले जाते. तेथे त्यांच्या आई-वडिलांना बोलावून घेतले जाते. अशा गुन्ह्यातील कारवाईसंबंधीची माहिती त्यांना दिली जाते. त्याचवेळी त्या मुलांचे समुपदेशनही केले जाते. क्वचितप्रसंगी तीव्रता पाहून गुन्हाही दाखल केला जातो. आवश्‍यकतेप्रमाणे मुलींचेही समुपदेशन केले जाते. 

 कोल्हापूर पोलिस परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट २०१६ मध्ये या पथकाची स्थापना झाली. त्यानंतर गेल्या जवळपास दीड वर्षात चाकण पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील निर्भया पथकाने नऊशेहून अधिक कारवाया केल्या आहेत. आमच्या पथकातील कर्मचारी साध्या गणवेशात गर्दीत मिसळतात. क्वचित प्रसंगी विद्यार्थिनी बनून शाळा-महाविद्यालयातील वर्गातही बसतात. छेडछाडीचा प्रयत्न करणाऱ्या मुलांना पकडून त्यांच्यावर कारवाई करतात. 
-अर्चना दयाळ, फौजदार, चाकण पोलिस ठाणे

तनिष्कांसाठी विशेष कार्यक्रम
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता. ७ मार्च) पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील तनिष्का सदस्यांसाठी महिला सुरक्षितता या विषयावर प्रात्यक्षिक व माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘सकाळ‘च्या बुधवार पेठेतील कार्यालयात दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात चाकण पोलिस ठाण्याचे निर्भया पथक काही प्रसंग, कारवाई व रंजक किस्से सांगणार आहे. खेड उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे हे सुरक्षाविषयक कायदे व महिलांनी घ्यावयाची काळजी, यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी स्वसंरक्षण कसे करावे, यासंबंधीचे प्रात्यक्षिकही या वेळी दाखविले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com