'शिक्षणातूनच मिळेल नवी दिशा'

'शिक्षणातूनच मिळेल नवी दिशा'

पुणे -‘‘तुम्ही पोलिस व्हा, डॉक्‍टर व्हा किंवा डान्सर व्हा... इच्छा आहे त्या विषयात करिअर जरूर करा; पण स्वतः खूप शिका, शिक्षण घ्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहा...कारण शिक्षणानेच तुम्हाला मिळेल नवी दिशा...,’’ ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत मानाचा किताब पटकावणारी डॉ. समज्ञा ढवळेश्‍वर आणि उपविजेत्या डॉ. तबस्सुम मुल्ला व प्रिया सिंग सांगत होत्या. त्यांचा सल्ला ऐकून मुले प्रभावित झाली आणि त्यांनी शिक्षण घेण्याचा निर्धारही केला. 

पु. ना. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ या स्पर्धेतील विजेत्यांनी गुरुवारी (ता. २२) बुधवार पेठेतील स्वाधार संस्थेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांसमवेत भोजन घेतले. त्यांना ‘रॅम्प वॉक’ करून दाखविला. स्वाधारच्या सचिव संजीवनी हिंगणे उपस्थित होत्या. रूपसंपदा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘सौंदर्यवती’चा किताब पटकाविणाऱ्या या तरुणींच्या समवेत संस्थेतील मुलांनी मनसोक्त गप्पा मारल्या. तरुणींनीदेखील मुलांसमवेत सेल्फी काढले. संस्थेतील पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी या सौंदर्यवतींचे उत्स्फूर्त स्वागत केले. 

संजीवनी हिंगणे म्हणाल्या, ‘‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेतील सौंदर्यवतींना भेटल्याचा मुलांना आनंद झाला. आयुष्यात यशस्वी होण्याकरिता रोल मॉडेल हवे असते. ‘ब्यूटी विथ ब्रेन’चे मूर्तिमंत उदाहरण या सौंदर्यवती आहेत. त्यांनीही उच्च शिक्षण घेतले आणि स्वतःची आवड जोपासली. करिअरसाठी पहिल्यांदा चांगले शिक्षण घ्या हेच सांगण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे नेहमीच केला जातो.’’ 

डॉ. समज्ञा ढवळेश्‍वर म्हणाली, ‘‘एखाद्या परीला भेटल्याचा आनंद या मुलांना झाला. त्यांना भेटून खूप समाधान वाटले. आपण सेलिब्रिटी आहोत, असे जाणवत होते. पोलिस, डान्सर व्हायची इच्छा मुलांनी बोलून दाखवली. भरपूर खेळा; पण चांगले शिक्षण घ्या, असे सांगितल्यावर मुलांनी चांगले शिकण्याची इच्छा व्यक्त केली.’’

डॉ. तबस्सुम मुल्ला म्हणाली, ‘‘आमच्या समाजात लवकर लग्न करतात; पण मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते. म्हणून तुम्हीही भरपूर शिक्षण घ्या. स्वतःच्या पायावर उभे राहा. एखाद्या सेलिब्रिटीकडून मिळालेल्या सल्ल्याचा स्वीकार केल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.’’ 

प्रिया सिंग म्हणाली, ‘‘मी शिक्षण पूर्ण केले. मगच आवडीच्या क्षेत्राकडे वळले. लहान मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर तीही यशस्वी होऊ शकतात. त्यातूनच तुमचे आयुष्य घडते. तुमची स्वतंत्र ओळख निर्माण होते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com