दिमाखदार सोहळ्याला ग्लॅमरचा तडका !

दिमाखदार सोहळ्याला ग्लॅमरचा तडका !

पुणे - एक-एक करत त्या व्यासपीठावर येत होत्या...प्रत्येकीतच एक वेगळी चमक...कधी पारंपरिक, तर कधी ‘वेस्टर्न आउटफीट’मधील ‘ग्लॅमरस लूक’ने त्या उपस्थितांना घायाळ करत होत्या...टॅलेंट हंट असो वा रॅम्पवॉक...जणू पऱ्याच जमिनीवर अवतरल्याचा भास सर्वांना होत होता. त्यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे अवकाश मिळाले होते अन्‌ कौशल्य दाखविण्याची संधीही...याच संधीचं सोनं करत पुण्याच्या समज्ञा ढवळेश्‍वर हिने  पु. ना. गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ होण्याचा बहुमान पटकावला, तर प्रिया सिंग आणि तबस्‍सुम मुल्ला या उपविजेत्‍या ठरल्‍या. 

समज्ञा हिला ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’चे मालक अजित गाडगीळ यांच्या हस्ते विजेतेपदासाठीचा मुकुट प्रदान करण्यात आला. विजेते ठरल्याचे ऐकताच समज्ञासह तिच्या आईवडिलांचेही डोळे पाणावले. ‘स्वप्नांकडे झेप घेण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे ही स्पर्धा,’ अशी बोलकी प्रतिक्रिया समज्ञाने दिली. 

प्रिया सिंग हिला निर्माते नानिक जयसिंघानी आणि ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप द्विवेदी यांच्या हस्ते, तर तबस्‍सुम मुल्ला हिला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’च्या डॉ. रेणू गाडगीळ यांच्या हस्ते उपविजेत्यासाठीचा मुकुट प्रदान करण्यात आला. दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते समीर धर्माधिकारी, अदिती गोवित्रीकर, निर्माते नानिक जयसिंघानी, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव आणि डॉ. रेणू गाडगीळ यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण केले.  

विविध क्षेत्रांतील तरुणींनी स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची झलक दाखवली. सुरवातीला ३२ तरुणींनी पारंपरिक वेशभूषेत रॅम्पवॉक केला. ग्लॅमरस लूक आणि दिलखेचक सौंदर्याने प्रत्येक जण घायाळ झाला. तर, टॅलेंट हंटसाठी निवडलेल्या १२ तरुणींनी अभिनय, नृत्य आणि गायनाचे कौशल्य दाखवत आपले वेगळेपण सिद्ध केले. ठसकेबाज लावणी असो वा वेस्टर्न नृत्याविष्काराने प्रत्येकीने दाद मिळविली.

बुद्धिमत्ता चाचणीतही परीक्षकांच्या प्रश्‍नांची तरुणींनी निर्भीडपणे उत्तरे दिली. अदिती कण्याळकर (नाशिक), नेहा शिवसरण (सोलापूर) यांच्यासोबत पुण्यातील समज्ञा, प्रिया, तबस्‍सुम आणि सुश्‍मिता भंडारी यांच्यात ही फेरी रंगली. कोणी करिअर अन्‌ प्रेम, तर कोणी या जगातील सर्वोत्कृष्ट महिलेबद्दल मनमोकळी उत्तरे देऊन उपस्थितांची मने जिंकली. या दिमाखदार सोहळ्यात ग्लॅमरचा तडकाही पाहायला मिळाला. एमजे ग्रुपने आपल्या नृत्याविष्काराने साऱ्यांना ठेका धरायला लावला. मायकल जॅक्‍सनच्या ‘डायहार्ट फॅन’ असलेल्या या ग्रुपमधील प्रत्येकाने आपल्या नृत्याविष्काराने प्रत्येकाला नाचायला लावले. गायक रोहित राऊत याने आपल्या गायकीने उपस्थितांना ठेका धरायला लावला. अभिनेते विजय पाटकर आणि सौरभ गोखले हे अक्षरश- त्याच्या गाण्यावर थिरकले. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि संस्कृती बालगुडे यांच्या नृत्याच्या जुगलबंदीने कार्यक्रमात रंगत आणली. मृण्मयी आणि संस्कृतीचे आगळेवेगळे सादरीकरण प्रत्येकीसाठी काहीसे खास ठरले. या अंतिम सोहळ्यात विविध क्षेत्रांतील तरुणींनी आपले कौशल्य दाखवत उपस्थितांना चमक दाखवली आणि परीक्षकांच्या कौतुकाची थापही मिळविली. स्पर्धेतील तरुणींमध्ये जोश, जल्लोष आणि वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी पाहायला मिळाली. त्यांनी ‘सकाळ’चे आर्वजून कौतुक केले. करिअरसाठी एक वाट मिळाल्याचीही बोलकी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.

स्पर्धेतील इतर पुरस्कार विजेत्या तरुणींना अभिनेते विजय पाटकर, सोनाली खरे, सौरभ गोखले, अदिती सारंगधर, मीता सावरकर, गौरी नलावडे, भूषण प्रधान या सेलिब्रिंटीच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले. पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे मुख्य विपणन अधिकारी नंदू देवळे, लीझ ब्यूटी सेंटर ॲण्ड स्पाच्या संचालिका लीना खांडेकर, स्टार्स कॉस्मेटिक्‍सचे डॉ. विशेष नायक, फॅशन डिझायनर श्रुती आणि मंगेश, सिटी कॉर्पोरेशनचे आदित्य देशपांडे, अनिरुद्ध देशपांडे, हायटेक डेंटल क्‍लिनिकच्या संचालिका डॉ. मनीषा गरुड, आयपिंकच्या तृप्ती गुप्ता, रिचफिल हेल्थ ॲण्ड ब्यूटी प्रा. लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीमा भदोरिया, टॉपलाइन सुपर सॉल्टचे किशोर छेडा, मॉडेल श्‍वेता राज, वॅरोनिका रॉबिन, ‘स्वाधार’च्या सचिव संजीवनी हिंगणे आणि इव्हेंट डायरेक्‍टर लवेल प्रभू या वेळी उपस्थित होते. मुंबई, सोलापूर, पुणे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर या आठ विभागांमधील तरुणींमध्ये स्पर्धेची निवड चाचणी झाली. अभिनेता अमेय वाघ आणि नेहा देशपांडे यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

ही स्पर्धा म्हणजे ‘सकाळ’चे हे नवे पाऊल आहे. त्यातून तरुणींना आणि महिलांना आत्मविश्‍वास देणे, आत्मबळ निर्माण करणे आणि नवीन संधी मिळवून देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून देणे, स्वत-च्या पायावर कशा उभा राहू शकतील आणि त्या कशा पुढे जाऊ शकतील, हा त्यामागचा उद्देश आहे. ‘सकाळ’चे अनेक कार्यक्रम आहेत. शेतकऱ्यांपासून महिलांपर्यंत तनिष्का, मधुरांगण, सरपंच परिषद अशा विविध माध्यमांतून सातत्याने ग्रामीण ते शहरी भागातील स्त्रियांच्या प्रगतीसाठीचा हा प्रयत्न आहे.
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ

शहरासह ग्रामीण भागातील तरुणींनी या स्पर्धेत आपले कौशल्य दाखविले आहे. ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. राज्यातील कानाकोपऱ्यांतून आलेल्या तरुणींनी स्वत-चे कस लावून ही स्पर्धा आपल्या कौशल्याने आधीच जिंकली आहे. प्रत्येकात टॅलेंट दडलेले असते. ते आपण ओळखले पाहिजे आणि त्याला व्यासपीठ दिले पाहिजे. हेच व्यासपीठ तरुणींसाठी या स्पर्धेद्वारे निर्माण झाले आहे.
- महेश मांजरेकर, दिग्दर्शक

राज्यभरातील ३२ तरुणी अंतिम फेरीत पोचल्या आणि प्रत्येकात काही तरी वेगळेपण पाहायला मिळाले. या तरुणींमधील काहींना पुढे जाऊन मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. त्यासाठी त्यांनी जोमाने तयारी करायला हवी. शेवटी त्यांच्या मेहनतीमुळेच त्यांना आगामी काळात संधी मिळणार आहेत.
- नानिक जयसिंघानी, चित्रपट निर्माते

काही तरी हटके करायचे असेल, तर तसे व्यक्तिमत्त्व लागते. प्रत्येकात असे टॅलेंट असतेच. ते त्यांनी शोधले पाहिजे. अशा स्पर्धा त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलविण्यासह त्यांच्या करिअरला एक वाट देतात. ‘सकाळ’ने ही स्पर्धा आयोजित करून तरुणींना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यांच्यातील कलागुणांना यातून वाव मिळेल, हे नक्कीच.
- समीर धर्माधिकारी, अभिनेता

आजच्या नव्या पिढीत इच्छा-आकांक्षा आणि स्वप्नांची कमतरता नाही. या नव्या पिढीला पुढे जाण्यासाठी संधीची गरज असून, ती संधी ‘सकाळ’ने निर्माण करून दिली असून, त्याचा तरुणींनी फायदा घ्यावा. टॅलेंट सगळीकडे असते. पण, प्रत्येकालाच ती संधी मिळत नाही. संधीचं सोनं कसं करावं, हे आपण शिकले पाहिजे. तरुणींसाठी ही स्पर्धा चालून आलेली संधी म्हणावी लागेल.
- उमेश जाधव, नृत्यदिग्दर्शक

राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या तरुणींना स्पर्धेत आपली चमक दाखवता आली. तरुणींना योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्‍वास दिला, तर त्या खूप काही करू शकतात, हे त्यांनी यातून दाखवून दिले. हा एक अनोखा सोहळा होता. तरुणींना नवं अवकाश दाखविण्याचा ही एक वेगळी वाट होती.
- मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री

‘सकाळ’ने आयोजित केलेली ही स्पर्धा खूप छान होती. तरुणींना व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांच्यासाठी व्यासपीठही निर्माण करून देण्यात आले. ‘सकाळ’च्या या स्पर्धेतून चित्रपटसृष्टीतील करिअरसाठी संधी मिळणार आहे.
- अदिती गोवित्रीकर, अभिनेत्री

‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेतील इतर पुरस्कार
 लीझ ब्यूटी मिस टॅलेंटेड -     साक्षी पाटील (जळगाव)
 स्टार्स बेस्ट मेकओव्हर -     समज्ञा ढवळेश्‍वर (पुणे)
 डॉ. मनीषा गरुड हायटेक डेंटल क्‍लिनिक मिस ब्यूटीफुल स्माइल -    तबस्‍सुम मुल्ला (पुणे)
 ॲमनोरा मिस फोटोजेनिक -     अपूर्वा चव्हाण (पुणे)
 मिस कॉन्फिडंट -     सिमरन पाटील (नाशिक)
 मिस टॉपलाइन ॲक्‍टिव्ह -     प्रिया सिंग (पुणे)
 श्रुती मंगेश मिस फॅशन आयकॉन -     त्रिशा मुखर्जी (पुणे)
 मिस ग्लोइंग स्कीन -     ऐश्‍वर्या दळवी (कोल्हापूर)
 आयपिंक ब्यूटीफुल बॉडी -     अक्षता सावंत (मुंबई)
 रिचफिल मिस ब्यूटीफुल हेअर -     केतकी भावे (कोल्हापूर)

प्रायोजकांची नावे
 व्हेन्यू पार्टनर -     ॲमनोरा द फर्न हॉटेल्स ॲण्ड क्लब
 मेकअप पार्टनर -     स्टार्स कॉस्मेस्टिक्‍स इंडिया
 फूड पार्टनर -     टॉपलाइन सुपर सॉल्ट
 न्यूट्रिशिअन एक्‍स्पर्ट -     तृप्ती गुप्ता
 डिझाइन अँड कॉस्च्युम -     श्रुती आणि मंगेश
 हेअर पार्टनर -     रिचफिल हेल्थ ॲण्ड ब्यूटी प्रा. लिमिटेड
 हेअर स्टाइल पार्टनर -     लीझ ब्यूटी सेंटर ॲण्ड स्पा
 स्माइल पार्टनर -     हायटेक टेंडल क्‍लिनिक
 एनजीओ पार्टनर -     स्वाधार संस्था
 लाइफस्टाइल पार्टनर -     ॲमनोरा पार्क टाऊन
 इव्हेंट पार्टनर -     अप ऑन द स्टेज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com