सासवड पालिकेने कचरावेचकांना दिली नवी अोळख आणि रोजगारही

kachara-vechak
kachara-vechak

सासवड : शहरातील कचरा डेपो बंद झाल्याने अनेक कचरावेचकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच सासवड नगरपालकेने त्यांना अोळखपत्र, वेतन देत त्यांचा कचरा व्यवस्थापनात उपयोग करुन घेतला. याशिवाय 100 टक्के कचरा संकलन, अोल्या कचऱयाची कंपोस्ट खतनिर्मिती यावर भर दिला आहे.  

सासवड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण - 2018 च्या अनुषंगाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार कचरा वेचकांचा घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेत समावेश करण्याचा प्रयोग वेगळा आहे. त्याकरीता अगोदर कचरा वेचकांचा सर्व्हे केला गेला. वॉर्डनिहाय कचरा वेचकांची संख्या, नावे, पत्ता शोधला. हे कचरावेचक अगोदर पुरंदर हायस्कूलसमोरील कचरा डेपोत प्लास्टिक, भंगार आणि तत्सम वस्तू शोधत होते. हा कचराडेपोच बंद केल्याने कचरावेचकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचा कचरा व्यवस्थापनात अोळखपत्रासह समावेश करुन चांगले वेतन देण्याचा निर्णय अंमलात आणला. त्यातून कचरा वेचकांना व पालिकेलाही एकमेकांचा फायदा झाला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जळक यांनी प्रशासनातर्फे दिली.  

घरोघरी जाऊन कचऱयाचे शंभर टक्के संकलन केलेच जाते. मात्र, बाजारपेठ व व्यापारी क्षेत्रात दोन कप्पे असलेल्या कचराकुंड्याही ठेवल्या आहेत. शिवाय बागबगीच्यांमध्ये कंपोस्ट खताची निर्मिती सुरु केली आहे. शहरात घरगुती व व्यावसायिक अशा एकूण 10 हजार 146 मालमत्ता आहेत. प्रत्येक घरगुती मालमत्तांतील कचरा संकलनार्थ 500 किलो क्षमतेच्या पाच जीपगाड्या, भाजी मंडई व घाऊक फळबाजारात दोन टन क्षमतेचे काॅम्पॅक्टर वाहनांची व्यवस्था काम चोख पार पाडत आहे. शिवाय नित्यदिनी रस्त्यावरील झाडाई व रस्त्यालगतच्या लिटर बीन गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर फिरता असतो. त्यामुळे शंभर टक्के कचरा संकलन येथे यशस्वी झाले आहे.

पालिकेच्या जिजामाता उद्यान, डाॅ. आंबेडकर उद्यान, आचार्य अत्रे उद्यान, नानानानी पार्क, सोपाननगरीच्या दोन उद्यानांत कंपोस्ट खत प्रक्रिया तयार केले आहेत. सात ठिकाणी हागणदारीमुक्त व उघड्यावर लघुशंकेस बंदीची सात ठिकाणे जाहीर करण्यात आली. त्यातून पालिकेने कारवाई हाती घेतली. शहरातील रहदारी व गर्दीच्या, बाजारपेठेच्या 31 ठिकाणी कचरा संकलनासाठी दोन स्वतंत्र कप्पे असलेल्या सुधारित कुंड्या ठेवल्या आहेत. अोला व सुका कचरा वर्गीकरण करुन तो घंटागाडीतच टाकण्याबाबत पूर्णतः जनजागृती करण्यात आली आहे.

नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष विजय वढणे, आरोग्य सभापती अजित जगताप, आरोग्यप्रमुख मोहन चव्हाण आणि नगरसेवकांनी प्रभागनिहाय लक्ष घातल्यानेही सासवड शहर चकाचक झाले आहे. नागरिकांनीही उपक्रमास प्रतिसाद वाढविला आहे.

अस्वच्छतेतून 17 जणांवर दंडात्मक कारवाई

सासवड शहरात उघड्यावर शौचास बसणाऱया 9 व्यक्तींना हजाराप्रमाणे नऊ हजार रुपयांचा दंड आतापर्यंत केला. याशिवाय उघड्यावर कचरा टाकण्यास प्रतिबंध करणारे 30 ठिकाणी फलक लावले आहेत. असा कचरा टाकणाऱ्या, शंभर रुपयांप्रमाणे आतापर्यंत 8 जणांवर दंडाची कारवाई पालिकेने केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com