काळजीवाहूच बनले निष्काळजी

काळजीवाहूच बनले निष्काळजी

पुणे - ज्येष्ठ नागरिकांच्या सेवा-शुश्रूषेसाठी मनुष्यबळ पुरविणाऱ्या ‘केअर टेकर एजन्सी’वर कोणाचेच नियंत्रण नसल्याची सद्यःस्थिती आहे.  त्‍यामुळे ‘केअर टेकर्स’च्या पडताळणीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकही आपल्याकडे कामासाठी नव्याने येणाऱ्या व्यक्तींची किंवा आपल्या अडचणींची माहिती पोलिसांना देत नसल्याचे चित्र आहे. परिणामी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांची सेवा-शुश्रुषा करण्यासाठी काही दिवसांसाठी आलेल्या कामगाराने कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा किरकोळ कारणावरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. परिणामी ज्येष्ठांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शहरात एकटे-दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना औषधोपचारापासून विविध प्रकारच्या सोई-सुविधेसाठी ‘केअर टेकर्स’ची गरज भासते. त्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक जवळच्या ‘केअर टेकर्स एजन्सी’कडे कामगारांची मागणी करतात. त्यानुसार या एजन्सी कामगार पुरवितात. परंतु, अशा एजन्सी खरोखरच मान्यताप्राप्त आहेत का? त्यांनी पाठविलेल्या कामगाराने ज्येष्ठांच्या सेवेशी संबंधित आवश्‍यक अभ्यासक्रम केलेला आहे का? त्यांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता, स्वभाव कसा आहे? गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का? अशा काही महत्त्वाच्या गोष्टींची पडताळणी आवश्‍यक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. 

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या घरी नव्याने आलेल्या ‘केअर टेकर्स’ किंवा घरातील अन्य कामगारांविषयीची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. त्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत. स्वतःविषयीची माहिती पोलिसांना देण्यास ज्येष्ठ नागरिकही तयार होत नसल्याची सद्यःस्थिती आहे. 

या विषयी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा म्हणाले, ‘‘केअर टेकर्स हे केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशानेच येतात, अशा असंख्य तक्रारी आमच्याकडे येतात. त्यांना ज्येष्ठांविषयी कुठलीही आत्मीयता नसते. त्यामुळेच अनुचित प्रकार घडतात. ठिकठिकाणी ‘केअर टेकर्स एजन्सी’ सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यामध्ये किती मान्यताप्राप्त आहेत, असा प्रश्‍न आहे. त्यांच्याकडून पुरविल्या जाणाऱ्या कामगारांची पडताळणी केली जाते का? कामगारांविषयीची माहिती पोलिसांना दिली जाते का? हे पाहायला हवे. ‘केअर टेकर्स’चा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच संवेदनशीलही असले पाहिजे. सध्यातरी केअर टेकर्स एजन्सीवर कोणाचेही नियंत्रण नाही, हे दुर्दैव आहे.’’

आमच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिक संघटना, ज्येष्ठ नागरिक पोलिसांच्या संपर्कात असतात. त्यांचा व्हॉटस्‌ॲप ग्रुपही आहे. त्यामुळे ज्येष्ठांचे प्रश्‍न सोडविणे सोपे जाते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक त्यांना देण्यात आले आहेत. पोलिस अधिकारी व कर्मचारी ज्येष्ठांचे प्रश्‍न सोडविण्यास कायम प्राधान्य देतात.
- अमरिश देशमुख, पोलिस निरीक्षक, अलंकार पोलिस ठाणे

ज्येष्ठांना पुरविण्यात येणाऱ्या कामगारांची चारित्र्य पडताळणी केली जाते. त्यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, भाडेकरार, त्यांचे फोटो, शैक्षणिक कागदपत्रे, सध्याचे निवासाचे ठिकाण यासारख्या बारीकसारीक गोष्टी गांभीर्याने पाहिल्या जातात. त्याविषयी पोलिसांनाही माहिती दिली जाते. या दृष्टीने ज्येष्ठांच्या सुरक्षिततेची काळजी आम्ही घेतो.
- केअर टेकर्स एजन्सीचे प्रतिनिधी

ज्येष्ठ किंवा अतिज्येष्ठांना वयोमानानुसार समोरच्या व्यक्तीबद्दल असुरक्षितता व अविश्‍वास वाटतो. त्यामुळे पोलिसांना आवश्‍यक माहिती देत नाहीत. त्यातून ते अधिकच असुरक्षित होत जातात. म्हणून स्थानिक पोलिस व ज्येष्ठ नागरिक संघटनांशी संवाद वाढविला पाहिजे. समाजानेही ज्येष्ठांकडून ज्ञान, अनुभव व परिपक्वता या गुणांचा स्वतःसाठी फायदा करून घेताना ज्येष्ठांशी संवाद वाढविला पाहिजे.
- प्रा. तेज निवळीकर, ज्येष्ठ नागरिक क्षेत्रातील कार्यकर्ते 

ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे प्रयत्न
पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्या पुढाकारातून मागील वर्षी ‘ज्येष्ठ नागरिक कक्ष’ सुरू करण्यात आला. त्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या अनेकदा बैठकाही झाल्या. त्यातून ज्येष्ठांचे प्रश्‍न काही प्रमाणात सुटू लागले. याबरोबरच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या पातळीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून आपापल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाशी सातत्याने संपर्कही ठेवला जात आहे. पोलिसांशी संवाद वाढविण्याविषयी त्यांच्यात जागृतीही केली जात आहे. ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या महिला पोलिस हवालदार जयश्री जाधव म्हणाल्या, ‘‘ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या हेल्पलाइनवर (१०९०) दररोज किमान दहा तक्रारी येतात. त्यांच्या फोननंतर पोलिस अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या तक्रारीचे निवारण करतात. ज्येष्ठ नागरिकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या कामगारांची माहिती पोलिसांना देणे आवश्‍यक आहे.’’  

ज्येष्ठांच्या तक्रारींचे स्वरूप
 पैसा व मालमत्तेवरून होणारा कौटुंबिक त्रास
 कामगारांच्या अवास्तव मागण्या
 इमारतीखाली किंवा घराभोवती होणाऱ्या चर्चा
 काही व्यक्तींकडून असुरक्षित वाटणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com