समस्या सोडविण्यासाठी हवी जैवविविधता समिती

समस्या सोडविण्यासाठी हवी जैवविविधता समिती

पुण्यातील मोठ्या बागांबद्दल काय सांगाल? 
- पुण्यातील मोठ्या बागांपैकी एम्प्रेस गार्डन ही एक आहे. यासह खडकीला बॉटेनिकल गार्डन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बंडगार्डन अशा काही मोजक्‍याच मोठ्या बागा शहरात आहेत. या बागांवर हळूहळू आघात होत गेले. एम्प्रेस गार्डनची जागा सुरवातीला 55 एकर होती. आता जवळपास 37 एकरच जागा शिल्लक आहे. पुणे विद्यापीठ, खडकीतील उद्यानांच्या जागांवरही अतिक्रमण झाले आहे. विद्यापीठाच्या बागेतील जुनी झाडे तोडली गेली. सगळीकडेच बागांच्या मूळ जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत आहे. हे असेच सुरू राहिल्यास शहर आणि परिसरात सर्वत्र कॉंक्रिटचे जंगल निर्माण होईल आणि हे अशोभनीय आहे. 

"एम्प्रेस गार्डन'चे तुमच्या दृष्टीने महत्त्व काय? 
- शहराचा सर्वांगीण विस्तार होत असताना उपलब्ध वृक्षसंपदेचे संवर्धन करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शहरातील मोठ्या बागांपैकी सर्वांत जुने आणि विस्तारलेले असे "एम्प्रेस गार्डन'चे वैशिष्ट्य आहे. शहराचा ऐतिहासिक पर्यावरणीय वारसा म्हणून या उद्यानाकडे पाहायला हवे. ब्रिटिशांनी ही बाग टिकविली, हेही वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आजपर्यंत बागेत वेगवेगळ्या प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली जात आहे. "एम्प्रेस'ची व्यवस्थापन पाहणारी ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था सरकारचा एकही पैसा न घेता उद्यानाचे व्यवस्थापन आजपर्यंत सांभाळत आहे. त्यामुळे उद्यानांच्या जैववैविध्यात वर्षानुवर्षे भर पडत आहे. जुनी वृक्षराजी असणाऱ्या अशा बागांची जागा लाटण्याचा प्रकार अयोग्य आहे. 

गार्डनचे वैशिष्ट्य काय सांगता येईल? 
- उद्यानात ताडा-माडाच्या असंख्य प्रजाती आहेत. त्याचबरोबर पामवृक्ष, मोठा कांचन वेल अशी अनेक वृक्षराजी येथे आहे. दीडशे वर्षांहून अधिक जुनी वृक्ष या परिसरात डौलात उभी आहेत. उष्ण प्रदेशातील विविध वनस्पती येथे पाहायला मिळतात. आगामी काळात येथे साकारण्यात येणारे जैवविविधता उद्यान हे पुणेकरांसाठी वैशिष्ट्यपूर्ण असेल. उद्यानातील नर्सरी उत्तम आहे. दुर्मिळ वनस्पतींची रोपे तयार करण्यात येतात आणि त्याची लागवडही केली जाते. मोकळ्या जागेवर वेगवेगळे प्रयोग करता येतात, म्हणूनच उद्यानात काही मोकळी जागा आवश्‍यक आहे. 

मोकळ्या जागांवर अतिक्रमण होतेय का? 
- मोकळ्या जागांचा आनंद घेणे, हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. मोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्येही हिरवळ, मोकळी जागा असल्याचे जाहिरातींमध्ये आवर्जून सांगितले जाते. श्रीमंतांना निसर्गरम्य जागांमध्येच अधिक रस असतो. मग सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या मोकळ्या जागा, हिरवळीवर अतिक्रमण का? हा प्रश्‍न आहे. नागरिकांनाही मोकळ्या जागांचा आनंद लुटता आला पाहिजे; परंतु आजकाल बिल्डर्स आणि वजनदार राजकीय मंडळींचा मोकळ्या जागांवर डोळा असल्याचे दिसून येते. बिल्डर्सही आपल्या विविध प्रकल्पांमध्ये सुरवातीला मोकळ्या जागा दाखवितात, कालांतराने त्या जागांवर विकासकामांच्या नावाखाली अतिक्रमणे होतात. 

उद्याने, मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी काय करता येईल? 
- शहरात मोकळ्या जागा दिसल्या की त्यावर बांधकाम करण्याचे बिल्डर्स लोकांचे कायमच मनसुबे असतात. बिल्डर्सशी लागेबांधे असल्याने लोकप्रतिनिधी पर्यावरणाच्या प्रश्‍नाबाबत नेहमीच निरुत्साही दिसतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी लोकचळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी घटनात्मक तरतुदींचा वापर केला पाहिजे. वॉर्डनिहाय पर्यावरण सद्य-स्थिती अहवाल तयार करणे आवश्‍यक आहे. जैवविविधता समिती स्थापन करून त्यामार्फत शहरातील जैवविविधतेचे प्रश्‍न निकाली काढले पाहिजेत. आपल्याकडे नागरिकांचे पुरेसे संघटन नाही, ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कायम संघटित राहण्याबरोबरच पर्यावरणीय तरतुदींचा वापर करून आपले पर्यावरण कसे असावे, हे नागरिकांनी ठरविले पाहिजे. त्यासाठी कायमस्वरूपी चळवळ उभी करण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com