शरद पवारांसाठी निलंगा ते बारामती सायकलवारी करणारा अवलिया!

मिलिंद संगई
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याप्रती स्नेहभाव प्रकट करण्यासाठी एक अवलिया गेली वीस वर्षे त्यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा ते बारामती अशी सायकलवारी करतो. कोणतीही प्रसिध्दी किंवा इतर बाबींपासून दूर राहून केवळ शरद पवार यांच्यावरील प्रेमाखातर हा अवलिया हा उपक्रम राबवतो. मराठवाड्यातील निलंगा येथील अब्दुल गनी महंमद साब खडके असे या 65 वर्षीय अवलियाचे नाव आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अब्दुल गनी यांनी या पक्षात सहभागी होत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरु केले. आजही मोलमजूरी करुन ते आपला उदरनिर्वाह चालवितात.

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याप्रती स्नेहभाव प्रकट करण्यासाठी एक अवलिया गेली वीस वर्षे त्यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा ते बारामती अशी सायकलवारी करतो. कोणतीही प्रसिध्दी किंवा इतर बाबींपासून दूर राहून केवळ शरद पवार यांच्यावरील प्रेमाखातर हा अवलिया हा उपक्रम राबवतो. मराठवाड्यातील निलंगा येथील अब्दुल गनी महंमद साब खडके असे या 65 वर्षीय अवलियाचे नाव आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अब्दुल गनी यांनी या पक्षात सहभागी होत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरु केले. आजही मोलमजूरी करुन ते आपला उदरनिर्वाह चालवितात. कोणतेही पद किंवा कसलाही लाभ त्यांनी आजवर मिळविला नाही, मात्र शरद पवार यांचे समाजासाठी जे योगदान आहे, ते अनमोल आहे आणि त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावे या एकाच कारणासाठी आपण ही सायकलवारी करतो असे अब्दुल गनी यांनी बोलताना सांगितले. 

दरवर्षी 12 डिसेंबरच्या अगोदर एक महिना ते सायकल चालविण्याचा सराव करतात. आणि चार दिवस अगोदर ते निलंग्याहून प्रयाण करतात. निलंगा, तुळजापूर, बार्शी, टेंभुर्णी, इंदापूरमार्गे ते चार दिवसात बारामतीला पोहोचतात. दररोज साधारणपणे 80 किमी. सायकल ते चालवितात. या उपक्रमाची फारशी ते कोणालाच माहिती देत नाहीत, प्रसिध्दीपासून गेली वीस वर्षे ते जाणीवपूर्वक दूर राहिले आणि केवळ पवारसाहेबांवरील प्रेमापोटीच मी हा उपक्रम राबवितो, मला कसल्याही प्रसिध्दीची गरज वाटत नाही असे ते अतिशय नम्रपणे नमूद करतात. बारामतीतील काटेवाडी येथे जाऊन शरद पवार यांच्या निवासस्थानाला भेट देऊन ते पुन्हा निलंग्याला परत जातात. वीस वर्षे कसलाही खंड न पडता त्यांचा उपक्रम बारामतीत सुरु आहे. यंदाही ते आज बारामतीत आले आणि आता परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. शरद पवार यांनी माणसे जोडली असे जे बोलले जाते त्याचे हे मूर्तिमंत प्रतीक म्हणावे लागेल. 

Web Title: Marathi news on sharad pawars birthday man completed cycle run from nilanga to baramati