रणगावमध्ये दारुबंदी करण्याची महिला सरपंचाची मागणी

राजकुमार थोरात
रविवार, 21 जानेवारी 2018

एका दारु व्यावसायिकाला बारामतीच्या प्रांतधिकाऱ्यांनी २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तरीही चोरुन दारु विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने येथील महिला सरपंच सुषमा राहुल रणमोडे, उपसरपंच नीता तेलगे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गावातील अवैध दारु बंदीचा निर्णय घेऊन शनिवार (ता.२०) रोजी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन गावातील दारुविक्री तातडीने बंद करण्याची मागणी केली.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील रणगाव येथील ग्रामपंचायतीने गावातील दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत वालचंदनगर पोलिसांना महिला सरपंच सुषमा राहुल रणमोडे यांनी निवेदन दिले.

रणगाव गावामध्ये गावातील चौघे जण बेकायदेशीरपणे देशी व हातभट्टीची दारु विक्री करीत आहेत.याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यांच्यावर अनेकवेळा वालचंदनगर पोलिसांनी कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत.

यातील एका दारु व्यावसायिकाला बारामतीच्या प्रांतधिकाऱ्यांनी २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तरीही चोरुन दारु विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने येथील महिला सरपंच सुषमा राहुल रणमोडे, उपसरपंच नीता तेलगे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गावातील अवैध दारु बंदीचा निर्णय घेऊन शनिवार (ता.२०) रोजी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन गावातील दारुविक्री तातडीने बंद करण्याची मागणी केली.

सरपंच रणमोडे यांनी पोलिसांना निवेदन देताच वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलिस हवालदार महेंद्र फणसे, गणेश काटकर, विजय शेंडकर यांनी तातडीने रणगाव गावमध्ये चार ठिकाणी छापे टाकले. पोलिस गावामध्ये आल्याची कुणकूण लागताच अवैध दारु विक्रेते पळून गेले. पोलिसांना घटनास्थळी दारु व इतर मुद्देमाल आढळला.  

दारूबंदीच्या जनजागृतीसाठी प्रभातफेरी

बुधवार (ता.२४) रोजी गावामध्ये दारूबंदीच्या जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात येणार असून, यामध्ये वालचंदनगर पोलिस सहभागी होणार आहेत. गावातील बहुसंख्य नागरिकांनी व महिलांनी प्रभातफेरीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कण्यात आले आहे. तसेच आगामी ग्रामसभेमध्ये गावातील दारूबंदीबाबत ठराव मांडण्यात येणार असल्याचेही सरपंच सुषमा रणमोडे यांनी सांगितले.

Web Title: Marathi News walchandnagar news ban on trunk demanded by sarpanch