पाणीपट्टी वाढीला वाढता विरोध 

पाणीपट्टी वाढीला वाढता विरोध 

पिंपरी - पाणीपट्टीवाढीला विरोध करण्यासाठी महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारापाशी विरोधकांनी केलेले जोरदार आंदोलन, सर्वसाधारण सभेच्या प्रारंभीच निषेधाचे फलक उंचावत आक्रमक झालेले विरोधी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक नगरसेवकांचा पाणीपट्टीवाढीच्या प्रस्तावाला पक्षांतर्गत केलेला विरोध यामुळे महापालिकेतील वातावरण मंगळवारी दणाणून गेले होते. सर्वसाधारण सभा दोन-तीन मिनिटांत तहकूब झाल्याने पाणीपट्टीवाढीच्या प्रस्तावावर आज चर्चाच झाली नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 28 फेब्रुवारीला त्यावर चर्चा होईल. 

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू केले. त्यांचे नगरसेवक, स्थानिक नेते आक्रमकपणे घोषणा देत होते. त्याच वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मोठ्या संख्येने तेथे पोचले. "बघता काय, सामील व्हा' अशी घोषणा शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी देण्यास सुरवात केली. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, नगरसेविका वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, सुलक्षणा धर यांच्यासह अनेक नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले. माजी नगरसेवक मारुती भापकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय आल्हाट घोषणा देण्यात आघाडीवर होते. 

सत्ताधाऱ्यांसमोर मोठा "आवाज' 
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, भाजपने नगरसेवक तेथून जात असताना कार्यकर्त्यांच्या घोषणांचा स्वर टिपेला पोचत होता. शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष योगेश बाबर, गटनेते राहुल कलाटे, प्रमोद कुटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांच्यासोबत या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फलक उंचावत, घोषणा देत दुपारी एक वाजल्यापासून महापालिकेचे आवार दणाणून सोडले होते. 

फलकबाजीतून संदेश 
"पाणी दरवाढ कशासाठी, गाजराच्या शेतीसाठी', "दिला शब्द पाळलाच पाहिजे,' "फेकू भाजप हाय हाय,' "लुटून खा, भाजप', "खरडून खा, भाजप' अशा घोषणा एकापाठोपाठ दिल्या जात होत्या. "पाणीपट्टी रद्द झालीच पाहिजे,' या विरोधी पक्षनेते बहल यांनी दिलेल्या घोषणेला तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. "शास्तीकर रद्द झाला पाहिजे', "अनधिकृत बांधकामे नियमित करावीत,' "पवना बंदिस्त जलवाहिनी पूर्ण झाली पाहिजे,' अशा आशयाचे अनेक फलक आंदोलकांच्या हातात होते. 

सभेतही आंदोलन 
सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होताना सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या, शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर नितीन काळजे यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत उभे राहून घोषणा दिल्या. बहल यांच्यासह अनेक नगरसेवक सभागृहात पाणी भरण्याचे तांबे घेऊन आले होते. ते तांबे एकमेकांवर आपटत असल्यामुळे त्यांचा नाद घुमत होता. पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्याची मागणी नगरसेवक करीत होते. त्यांनी त्या संदर्भातील फलकही फडकाविले. त्या गदारोळातच महापौरांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. त्यानंतर, महापौरांनी तातडीने 28 फेब्रुवारीपर्यंत सभा तहकूब केल्याची घोषणा केली आणि राष्ट्रगीत सुरू करण्यास सांगितले. सभा तहकूब झाल्याने पाणीपट्टी दरवाढ, पाणीपुरवठा लाभकर वाढ या प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही. 

जनसंघाचे माजी नगरसेवक व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक दादा केसकर यांचे मंगळवारी (ता. 20) निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सर्वसाधारण सभा तहकूब केल्याचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. नगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचा निषेध करण्यात येत असल्याचे काळजे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com