पौगंडावस्थेतील मुलामुलींकरीता कार्यशाळा

marathi news workshop for youth boys and girls
marathi news workshop for youth boys and girls

भिगवण - पौगंडावस्था ही मुलांच्या आयुष्यातील एक महत्वपुर्ण टप्पा आहे. या काळामध्ये मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक बदल होत असतात. त्यामुळेही मुले गोंधळून जाऊन चुकीची पावले उचलण्याची शक्यता असते. या काळांमध्ये मुलांची नकार पचविण्याची तयारी नसते. पालकांनी मुलांची ही मानसिक अवस्था समजून घेऊन योग्य पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे मत पुणे येथे डॉ. यश वेलनकर यांनी व्यक्त केले.

येथील यशज्योति फाऊंडेशनच्या वतीने येथील शाम गार्डन येथे पौगंडावस्थेतील मुलांकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ होते. तर इंदापुर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अशोक शिंदे, डॉ. चंद्रकांत खाणावरे, अजित क्षीरसागर, सचिन बोगावत, प्राचार्य ए. एस. बंदीष्टी, राजकुमार मस्कर, रमेश धवडे, यशज्योती फाऊंडेशनच्या विश्वस्त ज्योती सोनोने उपस्थित होते. डॉ. वेलनकर पुढे म्हणाले, पालक हेच मुलांचे पहिले गुरु असतात आणि घर हे संस्कार केंद्र असते. बदललेल्या परिस्थितीमध्ये पालकांनी मुलांना जाणीवपुर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याशी सुसंवाद साधावा व इतरांशी तुलना टाळावी. मुलांवर जाणीवपुर्वक जबाबदारी टाकून त्यांचे भावविश्व समजून घेतल्यास पालक व मुलांमध्ये सुंदर नातेसंबध निर्माण होण्यास निश्चित मदत होईल.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले, यशज्योती फाऊंडेशनच्या वतीने पौगंडावस्थेतील मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा मुले व पालकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करुन देण्यासाठी उपयुक्त ठरेल. यावेळी डॉ. जयप्रकाश खरड, डॉ. चंद्रकांत खानावरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कल्याणी चौधरी यांनी केले. सूत्र संचलन जीवन शिंदे प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. पद्मा खरड यांनी करुन दिला. तर आभार नंदकिशोर सोनोने यांनी मानले. कार्य़शाळेसाठी दत्तकला शिक्षण संस्था, भिगवण शिक्षण संस्था, अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालय, कला महाविद्यालय आदी शाळा व महाविदयालयातील सुमारे १५०० मुले व पालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तुषार ढोणगे, किशोर फलके, अभिजित गाणबोटे, अक्षय भरणे, प्रज्वल धवडे, साहिल चितारे, ॠषी गायकवाड आदींनी प्रयत्न केले.

पौगंडावस्थेतील मुलांचे प्रबोधन
येथील यश सोनोने या अठरा वर्षाच्या मुलाने गतवर्षी आत्महत्या केली होती. मुलांच्या आत्महत्येनंतर त्या प्रसंगातून गेलेल्या सोनोने दांपत्यांनी अशा प्रकारचे दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याचा भाग म्हणून त्यांनी यशज्योती फाऊंडेशनची स्थापना करुन पौगंडावस्थेतील मुलांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यशज्योती फाऊंडेशनच्या माध्यमातून मुले व पालक यांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com