कलापिनीतील नाटकवाल्यांचा शशी कपूर यांच्या आठवणींना उजाळा

Marathi News_Shashi Kapoor_Kalapini
Marathi News_Shashi Kapoor_Kalapini

तळेगाव - जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी निधन झाले. १९८७ मध्ये तळेगावमधील कलापिनी दशवार्षिक महोत्सवाला शशी कपूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोमवारी शशी कपूर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर कलापिनीतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहताना शशी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सत्तरच्या दशकात हिंदी सिनेमात चॉकलेट बॉय अशी ओळख मिळवणाऱ्या शशी उर्फ टॅक्सी कपूर यांचा तळेगावशी भावबंध जुळला तो कलापिनीच्या कार्यक्रमात. १९८७ मध्ये कलापिनीच्या दशवार्षिक महोत्सवाचे समारोपाला शशी कपूर यांची उपस्थिती लाभली होती. या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते यशवंत दत्त यांचे हस्ते झाले होते. शशी कपूर यांचे चित्रपटांचे संकलक भानुदास दिवकर हे कलापिनीचे सदस्य ललित प्रभू यांच्या परिचयाचे होते. त्यांच्या समवेत शशी कपूर यांची भेट झाली आणि कलापिनीच्या दशवार्षिक महोत्सवाला येण्याची गळ त्यांनी घातली. हे निमंत्रण शशी कपूर यांनी स्विकारले होते. 

तळेगावातील पु. वा. परांजपे विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला होता. पुणे सकाळचे सुधीर गाडगीळ खास वार्तांकनासाठी येथे उपस्थित होते. रात्री ९ वाजता दादासाहेब परांजपे समवेत अध्यक्ष संजय तथा बाबा कडोलकर, शशी कपूर, नौशाद आणि नूरजहान पदमसी कार्यक्रम स्थळी उपस्थित झाले. उशिरामुळे उत्कंठा ताणलेल्या उभे राहून तळेगावकर रसिकांनी टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिल्याने शशी कपूर भारावून गेले. नांदी व हिंदीतून सादर झालेल्या नाती सूत्रधाराच्या प्रवेशाला शशी कपूर यांनी भरभरून दाद दिली. येताना सहा तास खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीत अडकल्यानंतरही त्रासाचे कोणतेही लक्षण त्याच्या चेहऱ्यावर नव्हते. त्यांच्या हस्ते कलापिनीच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की 'नाटकाशी माझे नाते आहे. मी एकवेळ शुटींग रद्द करेन पण नाटकवाल्यांचा कार्यक्रम नाही. आपण काम प्रोफेशनली करायला हवे, कमर्शियली नव्हे!' असा गुरुमंत्र यावेळी हौशी कलाकरांना त्यांनी दिला होता. आपली पत्नी जेनिफरची आठवण काढताना भावूक झालेले शशी कपूर, 'आप इतने जाडे कैसे हो गये?' या एका प्रेक्षकाच्या उद्धट प्रश्नावरही 'जाडे नही मोटे कहिये' असे मिश्किलपणे म्हणाले. शशी कपूर सलग तासभर प्रेक्षकांशी, कलाकारांशी दिलखुलास संवाद साधत होते. 

समस्त तळेगावकरांना तीन दशकांपुर्वी अगदी जवळून अनुभवायला मिळालेल्या शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहताना कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, विश्वास देशपांडे आणि सहकलाकारांचे डोळे साहजिकच पानावले.

१९८७ला कलापिनीच्या दशकपुर्ती सोहळ्यानिमित्ताने नाटकातील मंडळींशी गप्पागोष्टीत रमलेले शशी कपूर. (संग्रहीत फोटो) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com