महापौरपदासाठी भाजपकडून मुक्ता टिळक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

पुणे - नव्या महापौर आणि उपमहापौरांची नावे जवळपास निश्‍चित झाली असून, महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांना भाजपने संधी दिल्याचे सांगण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नगरसेवक नवनाथ कांबळे यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ पडण्याची शक्‍यता आहे. या नावांची औपचारिक घोषणा बुधवारी सकाळी होईल. दुसरीकडे, महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक एकत्रित लढविण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. 

महापौर आणि उपमहापौरपदासाठी येत्या बुधवारी (ता. 15) निवडणूक होणार आहे. त्याकरिता बुधवारी (ता. 8) अर्ज दाखल करण्याची मुदत असून, दुपारी तीन ते पाचपर्यंत नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे अर्ज दाखल करायचे आहेत. 

महापौरपदासाठी टिळक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले; तर उपमहापौरपद "आरपीआय'ला देण्याचा निर्णय घेतला असून, या पक्षाने कांबळे यांचे नाव निश्‍चित केले आहे. 

महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली. राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी नगरसेविका रेखा टिंगरे, नंदा लोणकर आणि सुमन पठारे यांच्या नावांची चर्चा आहे. उपमहापौरपदाकरिता कॉंग्रेसचा उमेदवार राहण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण म्हणाल्या, ""महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्याबाबत कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून अद्याप होकार मिळालेला नाही.'' 

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ""महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली आहे; परंतु, प्रदेश पातळीवरील नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ.'' 

""भाजपला पाठिंबा न देता सभागृहात विरोधी पक्षाची भूमिका निभावू,'' असे शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी सांगितले. 

विरोधी पक्षनेतेपदासाठी आज घोषणा 
विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक इच्छुक असून, त्याच्या निवडीचे सर्वाधिकार पक्षाचे नेते अजित पवार यांना देण्यात आले आहेत. याबाबत आज कोणतीही घोषणा झालेली नसली तरी बुधवारी (ता. 8) दुपारपर्यंत घोषणा होण्याची शक्‍यता आहे. या पदासाठी सव्वा किंवा अडीच वर्षांसाठी निवड करण्यात येण्याची शक्‍यताही पक्षाच्या वतीने वर्तविण्यात आली. 

स्वतंत्र गटाची नोंदणी 
महापालिका निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नगरसेवकांनी स्वतंत्र गट म्हणून विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी नोंदणी केली असून, गटनेता म्हणून डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची निवड केली आहे. 

Web Title: Mayor BJP Mukta Tilak