नितीन काळजे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार 

नितीन काळजे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार 

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 24 व्या महापौर व उपमहापौरपदासाठी मंगळवारी (ता.14) होणाऱ्या निवडणुकीकरिता भाजपकडून महापौरपदासाठी नितीन काळजे व उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांनी गुरुवारी (ता.9) उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी श्‍याम लांडे यांनी, तर उपमहापौरपदासाठी निकिता कदम यांनी अर्ज दाखल केला. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने काळजे व मोरे यांची निवड निश्‍चित मानली जात आहे. 

गेल्या पंचवार्षिकमधील नगरसेवकांची मुदत 12 मार्चपर्यंत आहे. 13 मार्च रोजी धूलिवंदनाची सुटी असल्याने महापौरपदाची निवडणूक मंगळवारी (ता.14) होणार आहे. सत्तारूढ पक्षनेतेपद भोसरी मतदार संघातील एकनाथ पवार यांना मिळाल्यानंतर भाजपचा पहिला महापौर कोण? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, संतोष लोंढे व नितीन काळजे यांची नावे चर्चेत होती. गुरुवारी महापौरपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने सर्वच इच्छुकांचे लक्ष वरिष्ठांच्या घोषणेकडे लागले होते. पालकमंत्री गिरीश बापट हे चार वाजता महापालिका भवनात आले. साडेचार वाजण्याच्या सुमारास बापट, पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, बाबू नायर यांच्या उपस्थितीत नितीन काळजे व शैलजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काळजे हे मोशी-चऱ्होली प्रभाग क्रमांक तीनमधून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. शैलजा मोरे या प्राधिकरण प्रभाग क्रमांक 15 मधून पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. 

राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी श्‍याम लांडे आणि उपमहापौरपदासाठी निकिता कदम यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, सभागृह नेत्या मंगला कदम, डब्बू आसवानी, नगरसेविका वैशाली काळभोर, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, उषा वाघेरे आदी उपस्थित होते. 

महापौर, उपमहापौरपदासाठी दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. येत्या 14 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता या दोन्ही पदांसाठी महापालिकेच्या सभागृहात निवडणूक होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. भाजपचे संख्याबळ लक्षात घेता भाजपचाच महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्‍चित मानले जात आहे. त्यामुळे नितीन काळजे हे भाजपचे पहिले महापौर ठरणार आहेत. सत्तारूढ पक्षनेतेपदापाठोपाठ महापौरपदही भोसरी विधानसभा मतदारसंघाला मिळाले आहे. 

एकनाथ पवार म्हणाले, ""भाजपच्या कोअर कमिटीने महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निवडीचे सर्वाधिकार दिले होते. त्यानुसार त्यांनी नितीन काळजे व शैलजा मोरे यांची नावे निश्‍चित केली.'' 

ग्रामीण भागाला न्याय - नितीन काळजे 
या वेळी बोलताना नितीन काळजे म्हणाले, ""पिंपरी-चिंचवड महापालिकेत गावे समाविष्ट करून 20 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र आत्तापर्यंत कोणतेही महत्त्वाचे पद समाविष्ट भागांतील नगरसेवकांना मिळाले नव्हते. मला महापौरपदाची संधी देऊन ग्रामीण भागाला न्याय दिल्यासारखेच आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुधारणे व वाड्या-वस्त्यांवर रस्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यास आमचे प्राधान्य राहील. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे व भाजपच्या सर्व नगरसेवकांनी माझ्यावर विश्‍वास टाकला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या सर्वांचा विश्‍वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी करेन.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com