महापौरपदाची निवडणूक १५ मार्चला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव; नव्यांना संधी मिळणार का ज्येष्ठांना

पुणे - मुंबईच्या महापौरांची निवड झाल्यानंतरच पुण्याच्या नव्या महापौरांची निवड होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, पुण्याच्या महापौरपदाची निवडणूक येत्या १५ मार्च रोजी होण्याची दाट शक्‍यता प्रशासनाने वर्तविली आहे. त्याचवेळी उपमहापौरपदाचीही निवड होणार असून, हे पद रिपब्लिकन पक्षाला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत असून, दुसऱ्या दिवशी महापौरपदाची निवडणूक घेऊन नव्या सदस्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या कामकाज सुरू होणार आहे. या बाबतचा अधिकृत कार्यक्रम दोन दिवसांत जाहीर होईल. महापालिका निवडणुकीत १६२ पैकी तब्बल ९८ जागा मिळवून भाजपने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. आता महापौर निवडीच्या हालचाली सुरू असून, हे पद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव असल्याने पक्षातून मुक्ता टिळक, नव्याने प्रवेश केलेल्या रेश्‍मा भोसले, वर्षा तापकीर, रंजना टिळेकर, प्रा. ज्योस्त्ना एकबोटे, माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री नागपुरे, मानसी देशपांडे, कविता वैरागे, मंजुश्री खर्डेकर आदी नगरसेविकांच्या नावांची चर्चा आहे. पक्ष ज्येष्ठतेच्या निकषावर महापौरपदाची संधी देणार का, निष्ठावान, विधानसभा मतदारसंघनिहाय प्रतिनिधित्व यांचा विचार करणार, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन ६ मार्च रोजी सुरू होत आहे; तसेच ८ मार्च रोजी मुंबईच्या महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुण्याच्या महापौरपदाबाबत ८ मार्चनंतरच निर्णय होणार असल्याचे पक्ष सूत्रांनी स्पष्ट केले.
 
उपमहापौरपद रिपब्लिकनला?
महापालिकेतील सत्तेची सर्वच पदे भाजपकडे राहणार आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) सलग पाच वर्षे उपमहापौरपद द्यावे, अशी चर्चा उभयपक्षांत सुरू आहे. त्यात पहिल्या वर्षासाठी नवनाथ कांबळे यांचे नाव पुढे आले आहे; तसेच रिपब्लिकन पक्षाच्या निवडून आलेल्या अन्य सदस्यांनाही संधी मिळावी, असा पक्षाचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबतचे सूत्र तीन- चार दिवसांत निश्‍चित होईल.

Web Title: mayor election on 15th March