महापौर विकणार पुन्हा इडली-वडा - शकुंतला धराडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

पिंपरी - महापौर-पदावरून निवृत्त झाल्यानंतर इडली-वडा आणि भजी पावचा व्यवसाय करणार असल्याचे मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी सांगितले. तसेच जनसेवेसाठी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

पिंपरी - महापौर-पदावरून निवृत्त झाल्यानंतर इडली-वडा आणि भजी पावचा व्यवसाय करणार असल्याचे मावळत्या महापौर शकुंतला धराडे यांनी सांगितले. तसेच जनसेवेसाठी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

महापौर धराडे यांचा कार्यकाल १२ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (ता. १०) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महापौर म्हणाल्या, ‘‘मला महापौर होण्याची संधी मिळाली. जनसेवा करताना कधीच स्वहित पाहिले नाही. भाजपची लाट असल्याने माझा पराभव झाला; मात्र सत्ता हे जनसेवेचे साधन असल्याने आपण कधीही राजकारणातून निवृत्त होणार नाही. कदाचित यापुढील काळात विधानसभेची निवडणूकही आपण लढवू; मात्र तोपर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी माझा पूर्वीचा इडली-वडा आणि भजी पावचा व्यवसाय पुन्हा सुरू करणार आहे.’’

धराडे म्हणाल्या, ‘‘माझ्या काळात अनेक कामे करण्याची संधी मिळाली. कामांबाबत पूर्ण समाधानी आहे; मात्र शहरातील सर्व पुतळ्यांवर मेघडंबरी बसविण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, याची खंत वाटते. राष्ट्रवादीचा पराभव जिव्हारी लागला आहे.माझ्या कारकिर्दीमध्ये शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. शहराला स्वच्छतेचा देशात नववा, तर राज्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. पुणे-मुंबई महामार्गावर दापोडीत नदीवर पूल उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन होऊन त्याचे कामही सुरू झाले. पिंपरी चौक येथे भीमसृष्टी, तर पिंपरीगाव येथे संभाजी सृष्टी उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. महापालिकेच्या सांस्कृतिक धोरणामध्ये प्रथमच आदिवासी महोत्सवाचे आयोजन करून बिरसा मुंडा जयंती महोत्सव सुरू केला. निगडीतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि चिंचवडमध्ये चापेकर स्मारकाचे उद्‌घाटनही कार्यकाळात झाले.’’

धराडे म्हणाल्या, ‘‘कार्यकाळात सुमारे साडेपाच हजार कार्यक्रमांना उपस्थिती लावली. पीएमपीच्या संचालिका नात्याने ५५० बस खरेदीचा निर्णय घेतला. सांगवी-किवळे, नाशिक फाटा-वाकड बीआरटी मार्गाचे उद्‌घाटनही झाले. चिखली येथे संतपीठ उभारणी, पवनाथडी जत्रेचे आयोजन, एकूण ३० महापौर चषकांचे आयोजन, मोरया म्युरलचे उद्‌घाटन आदी गोष्टी मनाला समाधान देणाऱ्या आहेत.’’

निवडणूक लढविण्यास भाग पाडले
‘‘कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना मी महापौर झाले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केले. महापालिकेची निवडणूक लढविण्यास इच्छुकच नव्हते; मात्र पक्षाने मला निवडणूक लढविण्यास भाग पाडले. त्यातच माझा पराभव झाला, ही खंत आपल्याला कायम राहणार आहे,’’ असे धराडे यांनी सांगितले.