वीजबिल भरूनही मीटर ‘कट’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

महावितरणचा कारभार; तक्रार करूनही न्याय मिळेना

पुणे - वीजबिल भरूनही महावितरणकडून मीटर काढून नेल्याचा प्रकार वारजे माळवाडी येथे घडला. यामुळे येथील रहिवासी जयवंत नारायण पंडित यांच्यावर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. वारंवार तक्रार करूनही त्याची कोणी दखल घेतली जात नसल्याने न्याय मागायचा तरी कोणाकडे, अशी त्यांची अवस्था झाली आहे.

जयवंत पंडित हे रात्रभर सुरक्षारक्षक म्हणून काम, तर दिवसा आजारी पत्नीची सेवा करतात. त्यांना आलेले वीजबिल भरण्याची अंतिम तारीख ५ एप्रिल होती; पण त्यांचा पगार दहा तारखेला होतो. म्हणून त्यांनी ११ एप्रिलला दंडासहीत रक्कम भरली आणि त्याच दिवशी त्यांचा मीटर काढून नेण्यात आला. 

पंडित म्हणाले, ‘‘मी नियमित वीजबिल भरतो. ११ एप्रिलला बिल भरले; परंतु त्याच दिवशी माझा मीटर काढून नेला. शिवणे आणि डहाणूकर कॉलनी येथील महावितरणच्या कार्यालयात चौकशी केली, तर शंभर रुपये दंड भरा असे सांगण्यात येते. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. कोणीच दखल घेतली नाही.’’ 

पंडित यांच्यासारखी अनेक प्रकरणे आहेत. चांगली सेवा मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी येत आहेत; परंतु अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मोघम उत्तर मिळत आहेत. याबाबत पुणे परिमंडलचे मुख्य अभियंता रामराव मुंडे म्हणाले,‘‘वारजे भागातील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कळवावे.’’

बिल भरायला पाचच दिवस उशीर झाला, तर लगेच मीटर काढून घेण्याचे कारण काय? महावितरणकडे हेलपाटे मारून मी दमलो आहे.
- जयवंत पंडित, वीज ग्राहक

टॅग्स