कात्रज-स्वारगेट धावणार मेट्रो

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

पिंपरी ते निगडी मार्गाचीही प्रक्रिया सुरू; लवकरच आराखडा

पुणे - पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सुरू होत असतानाच स्वारगेटपासून कात्रजपर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचा आराखडाही तयार करण्याच्या हालचाली सुरू होणार आहेत. या विस्तारित मेट्रोच्या आराखड्याच्या प्रत्यक्ष कामास सहा महिन्यांत प्रारंभ होणार आहे; तसेच निगडी-पिंपरी या मार्गासाठीची प्रक्रियाही त्याच काळात होईल. परिणामी निगडी ते कात्रज मेट्रो आकाराला येणार आहे. 

पिंपरी ते निगडी मार्गाचीही प्रक्रिया सुरू; लवकरच आराखडा

पुणे - पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सुरू होत असतानाच स्वारगेटपासून कात्रजपर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचा आराखडाही तयार करण्याच्या हालचाली सुरू होणार आहेत. या विस्तारित मेट्रोच्या आराखड्याच्या प्रत्यक्ष कामास सहा महिन्यांत प्रारंभ होणार आहे; तसेच निगडी-पिंपरी या मार्गासाठीची प्रक्रियाही त्याच काळात होईल. परिणामी निगडी ते कात्रज मेट्रो आकाराला येणार आहे. 

प्राथमिक सर्वेक्षणानंतर हा विस्तारित मार्ग भुयारी करायचा का, एलिव्हेटेड याचा निर्णय होणार आहे. मेट्रोच्या मूळ आराखड्यातील पिंपरी - स्वारगेट मार्गाचे विस्तारीकरण करावे, अशी मागणी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून होत आहे. पिंपरी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज, असे मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण होऊ शकते. मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे महामेट्रोने या पूर्वीही स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी या विस्तारीकरणासाठी हालचालीही होत असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘पिंपरी -स्वारगेट या मार्गावरील मेट्रो कात्रजपर्यंत धावली पाहिजे, असे आम्हालाही वाटते. सध्या मेट्रो मार्गाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. ३० मार्चंपर्यंत त्यांची मुदत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला दोन्ही शहरांत प्रारंभ होणार आहे. एकदा काम सुरू झाले, की स्वारगेट- कात्रज मार्गाच्या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल. त्यांतर्गत वाहतुकीचे प्रमाण, वाहनांची संख्या, रस्त्याची भौगोलिक रचना आदींचे सर्वेक्षण केले जाईल.

त्यानंतर अंतिम आराखडा मंजूर करून राज्य सरकार व केंद्र सरकारची त्याला मंजुरी घेण्यात येईल. या प्रक्रियेला किमान दोन वर्षे लागतील. दरम्यानच्या काळात पिंपरी - स्वारगेट मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असेल. त्याला अनुसरून विस्तारीकरणाचे प्रकल्प हाती घेतले जातील.’’ पिंपरी - निगडी या मार्गाचा आराखडाही याच धर्तीवर तयार केला जाईल. दोन्ही आराखडे तयार झाल्यावर त्यांना मंजुरी एकत्रित मिळावी, असाच महामेट्रोचा प्रयत्न असेल, असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले. 

बीआरटी रस्ता मेट्रोला सुसंगत

कात्रज - स्वारगेट रस्त्याची आणि त्यावरील बीआरटीची फेररचना करण्याचा प्रकल्प मेट्रोला सुसंगत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

कात्रज चौक ते सातारा रस्त्यावरील भाऊराव पाटील चौकादरम्यानच्या रस्त्याच्या फेररचनेचे काम महापालिकेने नुकतेच सुरू केले. 

सर्व्हिस रस्त्यांचा फारसा वापर होत नाही, हे लक्षात घेऊन दोन्ही बाजूंना प्रत्येकी सहा मीटरच्या तीन लेन, मध्यभागी बीआरटीसाठी प्रत्येकी साडेतीन मीटरची लेन, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड मीटरचा सायकल ट्रॅक व प्रत्येकी साडेतीन मीटरचा पदपथ असेल. 

हा प्रकल्प दीड वर्षांत पूर्ण होणार असून, त्यासाठी सुमारे ७५ कोटी रुपये खर्च येईल. 

या रस्त्यावर एलिव्हेटेड मेट्रो झाल्यास त्याचे खांब रस्त्यावर मध्यभागी घेता येईल. उड्डाण पुलाच्या ठिकाणी मेट्रो डाव्या किंवा उजव्या बाजूने जाईल.

भूमिगत मेट्रो झाल्यास रस्त्याच्या फेररचना प्रकल्पाची हानी होणार नाही, असे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले.

Web Title: metro route katraj-swargate