मेट्रोचे डिसेंबरअखेर भूमिपूजन?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

पुणे - शहरातील मेट्रो प्रकल्पाला येत्या सात डिसेंबरला होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्‍यता असून, त्यानंतर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन होईल, अशी शक्‍यता भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

मेट्रोला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (पीआयबी) परवानगी मिळाल्यानंतर या संदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. मेट्रोला अंतिम मंजुरी देण्याबाबत वेगाने हालचाली सुरू असून, त्यानुसार पुढील आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधान मोदी येत्या 24 डिसेंबरला पुणे दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, त्यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन होण्याची शक्‍यता असल्याचेही बिडकर यांनी सांगितले.

चोवीस तास पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचा निर्णय शहराच्या विकासाच्या दृष्टीने घातक आहे. या संदर्भातील प्रस्तावाला विरोध केल्यानंतर महापौर प्रशांत जगताप यांनी मांडलेली भूमिका चुकीची आहे, असेही बिडकर यांनी म्हटले आहे. पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेणार का?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

कर्जरोख्यांसाठी पालकमंत्री प्रयत्नशील
शहरात राबविण्यात येणारी चोवीस तास समान व शुद्ध पाणीपुरवठा योजना पुणेकरांच्या हिताची आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी कर्जरोखे उभारण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी बापट महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भातील प्रस्ताव महापालिका प्रशासन पुन्हा सर्वसाधारण सभेसमोर ठेवणार आहे.