मावळच्या सभापतिपदी म्हाळसकर बिनविरोध

मावळच्या सभापतिपदी म्हाळसकर बिनविरोध

वडगाव मावळ - मावळ पंचायत समिती सभापतिपदी भारतीय जनता पक्षाचे गुलाबराव गोविंदराव म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपचेच शांताराम सीताराम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री संतोष राऊत यांचा सहा विरुद्ध चार मतांनी पराभव केला. निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी; तसेच भंडारा व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

गेल्या २१ तारखेला झालेल्या मावळ पंचायत समिती निवडणुकीत भाजपने दहापैकी सहा जागा जिंकून पंचायत समितीत बहुमत प्राप्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या. मंगळवारी सभापती-उपसभापतिपदाची निवडणूक झाली. सभापतिपदासाठी भाजपकडून वडगाव गणातून विजयी झालेले गुलाबराव म्हाळसकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत सुभाष भागडे यांनी केली. उपसभापतिपदासाठी भाजपकडून टाकवे गणातून विजयी झालेले शांताराम कदम यांनी; तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजश्री राऊत यांनी अर्ज दाखल केला होता. हात उंचावून घेतलेल्या मतदानात कदम यांना सहा; तर राऊत यांना चार मते मिळाली.त्यामुळे कदम हे दोन मतांनी विजयी झाल्याची घोषणा भागडे यांनी केली. 

राष्ट्रवादीचे गटनेते दत्तात्रेय शेवाळे यांनी उभयतांचे अभिनंदन केले व विकासकामी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. गटविकास अधिकारी नीलेश काळे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

निवडीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते म्हाळसकर व कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे, माजी सभापती ज्ञानेश्‍वर दळवी, राजाराम शिंदे, मंगल वाळुंजकर, निवृत्ती शेटे, युवक अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, गणेश भेगडे, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, रवींद्र भेगडे, गणेश गायकवाड, जितेंद्र बोत्रे, राणी म्हाळसकर, संदीप काशीद उपस्थित होते. 

भेगडे म्हणाले, ‘‘तालुक्‍यातील जनतेने दिलेल्या संधीचा उपयोग जनसेवेसाठी करावा. पंचायत समितीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना राबवून मावळ तालुका विकासाचे आदर्श मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.’’ म्हाळसकर व कदम यांनी सर्वांच्या सहकार्याने लोकाभिमुख कारभार करून तालुक्‍याचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही दिली. गणेश भेगडे, ज्ञानेश्‍वर दळवी यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. म्हाळसकर व कदम यांची सजविलेल्या ट्रॅक्‍टरमधून गावातून मिरवणूक काढण्यात आली. भगवे फेटे परिधान करून महिला सहभागी झाल्या होत्या.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय
पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या माध्यमातून म्हाळसकर व कदम या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने खऱ्या अर्थाने न्याय दिल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे म्हाळसकर व कदम या दोघांचाही ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला होता; परंतु पराभवाने खचून न जाता पक्षकार्यात कार्यरत राहिल्याने व आता नशिबाने त्यांना साथ दिल्याने तालुक्‍यातील महत्त्वाच्या पदांवर त्यांची वर्णी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com