'लष्कर दहशतवादी संपविते; सरकारने दहशतवाद संपवावा'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

गेल्या दोन वर्षांत काश्‍मीरमधील दहशतवाद कमी झाला आहे. दहशतवाद्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र काश्‍मीरमधील आंदोलनांमध्ये वाढ झाली आहे. अर्थातच याला पाकिस्तानचा मिळणारा पाठिंबा चिंताजनक आहे. दहशतवादी संपविणे हे लष्कराचे काम आहे; तर दहशतवाद संपविणे हे सरकारचे काम आहे!

पुणे - काश्‍मीरमधील सध्याची आव्हानात्मक परिस्थिती व भारतीय लष्कराची यासंदर्भातील भूमिका या विषयाबद्दल बोलताना मेजर जनरल संजय भिडे (निवृत्त) यांनी आज (बुधवार) "दहशतवादी संपविणे हे भारतीय लष्कराचे काम आहे; तर दहशतवाद संपविणे हे सरकारचे काम आहे,'' अशी स्पष्टोक्ती केली.

या छोटेखानी मुलाखतीदरम्यान भिडे यांनी काश्‍मीरमधील दहशतवाद आणि यासंदर्भातील विविध संवेदनशील मुद्यांसंदर्भात सविस्तर भूमिका व्यक्त केली. भिडे यांची ही मुलाखत सकाळच्या फेसबुक पेजवर लाईव्ह स्वरुपात प्रक्षेपित करण्यात आली.

 

श्रीनगर येथील मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु असताना झालेल्या हिंसाचारादरम्यान फारुख अहमद दार या काश्‍मिरी युवकास लष्कराच्या जीपला बांधण्यात आल्याचे चित्रीकरण नुकतेच 'व्हायरल' झाले होते. यासंदर्भात बोलताना भिडे यांनी हा निर्णय त्या परिस्थितीनुरुप होता, असे स्पष्ट केले. या निर्णयामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविले; शिवाय इतरही कोणत्याही प्रकारची जीवितहानी न होता ही समस्या सोडविण्यात आली, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. मात्र याचवेळी याचा अर्थ प्रत्येक आंदोलनावेळी ही पद्धत वापरावयास हवी, असा नक्कीच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मानवाधिकार व लष्कर
लष्करामधील प्रत्येक अधिकाऱ्यास मानवाधिकारांचे भान असतेच. तशी काळजीही घेतली जाते. परंतु, हिंसक परिस्थिती उद्‌भविली असताना लष्कराने कारवाई केली; तर त्यास मानवाधिकारांचे उल्लंघन ठरविता येणार नाही

दहशतवाद व काश्‍मीर
गेल्या दोन वर्षांत काश्‍मीरमधील दहशतवाद कमी झाला आहे. दहशतवाद्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र काश्‍मीरमधील आंदोलनांमध्ये वाढ झाली आहे. अर्थातच याला पाकिस्तानचा मिळणारा पाठिंबा चिंताजनक आहे. दहशतवादी संपविणे हे लष्कराचे काम आहे; तर दहशतवाद संपविणे हे सरकारचे काम आहे!

धर्म व काश्‍मीर
काश्‍मीरमधील समस्येमध्ये याआधी धर्म हा घटक फारसा प्रभावी नव्हता. काश्‍मिरी राष्ट्रवाद हा या समस्येतील कळीचा मुद्दा होता. मात्र गेल्या काही काळापासून काश्‍मीर प्रश्‍नामध्ये धर्माचा प्रभाव जाणवू लागला आहे. ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे

बुऱ्हाण वणी याच्यावरील कारवाई योग्यच
बुऱ्हान वणी याच्यावर झालेली कारवाई योग्यच होती. देशाविरोधात जो हत्यार उचलेल, त्याला ठार मारलेच पाहिजे. दहशतवाद्यांचे उदात्तीकरण अजिबात नको.
याखेरीज काश्‍मीरच्या समस्येशी संबंधित असलेल्या इतर संवेदनशील मुद्यांवरही भिडे यांनी मार्मिक भूमिका मांडली.