बारामतीत दूधक्रांतीची बीजे - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

बारामती - चाळीस वर्षांपूर्वी ट्रस्टच्या माळरानावर शेती फुलवताना प्रसंगी सुरुंगाने दगड फोडावे लागले. आज तिथे शेती तंत्रज्ञानाचे नंदनवन फुलले आहे. त्याची आठवण येण्याचे कारण म्हणजे चाळीस वर्षांनंतर माळेगावच्या अशाच नव्या माळरानावर नव्याने दुधाच्या क्रांतीची बीजे रोवली. तेव्हा जुना प्रसंग आठवून शरद पवार यांनी येथील दगडगोठ्यांच्या जागी देशातील आदर्श ‘गोठे’ निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा आशावाद व्यक्त केला.

भारत दूध उत्पादनात जगात अग्रेसर आहे. परंतु येथील एक गाय एका वेतात सरासरी फक्त अडीच हजार लिटर दूध देते, तर नेदरलॅंडसारख्या सहामाही बर्फ असलेल्या देशात मात्र एक गाय प्रती वेताला १२ हजार लिटर दूध देते. भारतातील हे चित्र बदलण्यासाठीच शुक्रवारी (ता.२५) माळेगाव येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत सुरू होणाऱ्या भारतातील एकमेव पशुधन अनुवंश सुधारणा उच्च गुणवत्ता केंद्राची पायाभरणी झाली. त्याच्या करारावर दुपारी शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात परस्पर सामंजस्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या केंद्रासाठी नेदरलॅंड सरकारकडून रिक इवाग, एरिक जेन्सन यांनी तर ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी नेदरलॅंडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काउटन व ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.

यावेळी पवार यांनी जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘‘माळेगावात ट्रस्टच्या शेती फार्मवर आज जे चित्र दिसते, ते ४० वर्षांपूर्वी नव्हते. तेथे माळरानावरील दगडे फोडावी लागली. सुरुंग घ्यावे लागले. आज जेव्हा या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले, तेव्हा तेथील माळरानही दगडगोट्यांनी भरलेले दिसून आले. मात्र याच नवीन जमिनीवर काही दिवसांनी जे गोठे उभे राहतील, ते पाहायला देश, राज्यातील शेतकरी येतील आणि नवे तंत्रज्ञान आत्मसात करतील, हा विश्‍वास आहे.’’

प्रकल्पात 4 प्रयोगशाळा
माळेगावच्या या नव्या केंद्रात ५० देशी गायी, ५० पंढरपुरी म्हशी आणि १०० संकरित गायींचा अत्याधुनिक गोठा उभारला जाणार आहे, तसेच उच्च दर्जाच्या वीर्य उत्पादनासाठी वळूंचा गोठाही असेल. या प्रकल्पात चार प्रयोगशाळा असतील, ज्या प्रयोगशाळा राज्यातील दूध उत्पादकांच्या आयुष्यात क्रांती आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असे शरद पवार यांनी सांगितले.

Web Title: milk sharad pawar