आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पिंपरी - "माझ्याशी का बोलत नाहीस,' अशी विचारणा करीत एका महाविद्यालयीन युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (ता. 3) सकाळी वाकडमध्ये घडली. यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे आमदार संजय रेड्डी-बोदकुलवार यांची ती मुलगी आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पिंपरी - "माझ्याशी का बोलत नाहीस,' अशी विचारणा करीत एका महाविद्यालयीन युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (ता. 3) सकाळी वाकडमध्ये घडली. यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे आमदार संजय रेड्डी-बोदकुलवार यांची ती मुलगी आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अश्‍विनी संजय बोदकुलवार (वय 22, रा. सध्या रा. नवलेनगर, वाकड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. वाकडमधील बालाजी इन्स्टिट्यूटमध्ये अश्‍विनी एमबीएचे प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. राजेश परवेशकुमार बक्षी (वय 22, रा. हरियाना) या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास अश्‍विनी मैत्रिणीसोबत महाविद्यालयात जात होती. त्या वेळी आरोपी बक्षी तिथे आला. "तू माझ्याशी का बोलत नाहीस,' अशी विचारणा करीत त्याने तिच्यावर सत्तूरने वार केले. ते अश्‍विनीने हातावर घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तिच्या डाव्या हाताची करंगळी तुटली. हल्लेखोराने केलेल्या मारहाणीत तिच्या तोंडालाही जखम झाली असून, तीन दातही पडले आहेत. 

अश्‍विनी व तिच्या मैत्रिणीने आरडाओरडा केल्याने तेथील काही महाविद्यालयीन युवकांचे लक्ष गेले. त्यांनी आरोपीला जेरबंद करून त्याच्या हातातील शस्त्र खाली पाडले. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. जखमी झालेल्या अश्‍विनीला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी पोलिसांना सांगितले. 

महाविद्यालयाकडे केली होती तक्रार 
राजेश बक्षी आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार अश्‍विनीने बालाजी इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहामधील अधिकाऱ्यांकडे रविवारी केली होती. याबाबत फोनवरून तिने वडिलांनाही सांगितले होते. मात्र, त्यांनी पुढील कार्यवाही करण्यापूर्वीच सोमवारी (ता. 3) सकाळी आरोपी बक्षीने अश्‍विनीवर प्राणघातक हल्ला केला. 

Web Title: MLA's assault on girls